जळोची (वार्ताहर) – बारामतीत बुधवारी (दि.4) न्यायालयाने धार्मिक स्थळावरील भोंग्याच्या आवाजासंदर्भात घालून दिलेल्या नियमानुसार मनसेच्यावतीने येथील कऱ्हा नदीलगत असणाऱ्या हनुमान मंदिरात गणपती आरती व हनुमान चालिसा पठण केले.
यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर म्हणाले की, उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळावरील भोंग्या संदर्भात जे नियम घालून दिले आहे. त्याचे पालन केले पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आमच्यापासून करीत आहोत.
बारामतीत अनधिकृत भोंगे उतरवा
पोलिस प्रशासनाने भोंगा वापराची वेळ आणि आवाजाच्या मर्यादवर लक्ष ठेवावे. ज्या ठिकाणी अनधिकृत भोंगे आहेत. ते उतरवून घ्यावे व परवानाप्राप्त भोंगे जर आवाज व वेळेची मयार्दा पाळत नसतील तर त्यावर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेच नाही तर परिसरातील जागरूक नागरिक पोलिसांना या कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सदैव सहकार्य करण्यास तयार आहेत, अशी माहिती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
बारामती शहर पोलीस ठाण्याला बुधवारी (दि. 4) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. सुधीर पाटसकर यांनी निवेदन दिले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. निवेदनानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनधिकृत भोंग्याविरोधात आवाज उठवल्यानंतर बारामतीत देखील अनेक मशिदींनी पूर्वीप्रमाणे अनधिकृतपणे भोंगे न वापरता रितसर अर्ज करून ध्वनिक्षेपक वापरण्यास कायदेशीर परवाना प्राप्त केला.
हा कायद्याच्या दृष्टीने एक सकारात्मक बदल आहे. त्याकरिता आम्ही त्या सर्वांचे अभिनंदन करतो. परंतु कायद्याचा व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा उद्देश सफल होण्यासाठी त्याची योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.