मुंबई -आयपीएल स्पर्धा यंदाच्या मोसमात सुरुवातीच्या सामन्यांत फारशी लोकप्रियता दिसत नव्हती. मात्र, या स्पर्धेचे बाजारमूल्य काही दिवसांतच सर्वाधिक ठरले असून जगातील सर्वात श्रीमंत लीग बनली आहे. आयपीएलच्या बाजारमूल्यातील वाढ ही अमेरिकेतील एनबीए व एनएफएलपेक्षाही जास्त आहे.
आयपीएलची सुरुवात झाल्यावर 2009 साली फोर्ब्जने केलेले आठही संघांचे मूल्यांकन जवळपास 67 मिलियन डॉलर (जवळपास 515 कोटी रुपये) होते. यंदा संघांची संख्या 8 वरून 10 पर्यंत वाढली. त्यानंतर फोर्ब्जने केलेल्या मूल्यांकन 1.04 बिलियन डॉलरवर (जवळपास 7 हजार 965 कोटी रुपये) पोहोचले आहे.
आयपीएलच्या मूल्यांकन वाढीचा दर वार्षिक 24 टक्के इतका प्रचंड आहे. आयपीएलचे सध्याचे मूल्य सुमारे 7 बिलियन डॉलर (जवळपास 53 हजार 610 कोटी रुपये) आहे. तसेच बीसीसीआयने केलेल्या माध्यमहक्क करारानंतर हेच मूल्य 10 बिलियन डॉलर (अंदाजे 76 हजार 590 कोटी रुपये) होण्याची शक्यता आहे.