महापालिकेचे होते दुर्लक्ष; नागरिकांकडून पैसे घेत असल्याचा प्रकार उघड
बिबवेवाडी – महानगरपालिकेचे कै. शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुलाचा अनधिकृतपणे ताबा घेत काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन चुकीच्या पद्धतीने चालवित असल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना घेराव घातल्यानंतर सदर क्रीडा संकुल सील करण्यात आले आहे.
याबाबत मनसेचे जनाधिकार सेनेचे शहराध्यक्ष विशाल शिंदे यांनी सांगितले की, महानगरपालिकेचे कै. शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुलचे उद्घाटन चार वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते येथील करण्यात आले होते. ठाकरे स्वतः येथे बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेत असत. या संकुलाचा लाभ अनेक नागरिकांसह खेळाडूंनाही होत होता.
मात्र, प्रशासकीय दुर्लक्ष व राजकीय वादात क्रीडा संकुलाची गेल्या दोन वर्षांपासून वाताहत झाली. त्यातही सदर संकुलाचा अनधिकृतपणे ताबा घेत काही जण नागरिकांकडून पैसे घेऊन हे संकुल चालवू लागले होते. याचाच जाब अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांना घेराव घालून विचारण्यात आला तसेच संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. त्यानंतर, पालिकेची प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली आणि गुरुवारी (दि.5) रात्रीच्या रात्री सदर संकुल सील करण्यात आले.
या आयुक्त घेराव मोहिमेत रोजगार-स्वयंरोजगार सेनेचे शहराध्यक्ष अनिल राणे, जनाधिकार सेनेचे शहर उपाध्यक्ष अरूण येवले, वृषभ शिंगवी, मंगेश जोशी, अभिजीत टेंबेकर तसेच वृषभ झेंडे, रविंद्र कानडे, अजय बुलबुले, सूरज जाधव, समर्थ साळुंके, मंदार जगताप, परशुराम लवाटे यांनी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप यांनी सहभाग घेतला.
कै. शकुंतला किसनराव शिंदे बहुउद्देशीय क्रीडा संकुल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार सिल करण्यात आले आहे. याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– किशोरी शिंदे, सहाय्यक आयुक्त, क्रिडा विभाग, महानगरपालिका