लंडन :– युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर फिफाआणि युएफाया फुटबॉल संघटनांनी रशियावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे रशियाला फिफाविश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रता सामन्यांत खेळता येणार नाही. रशिया फुटबॉल महासंघाने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. मात्र क्रीडा लवादाने त्यांची याचिका तिसऱ्यांदा फेटाळून लावली आहे.
फिफाने 8 मार्च रोजी रशियावर बंदी घालत विश्वचषक पात्रतेच्या लढतीमध्ये पोलंडला पुढे चाल देण्याचा निर्णय घेतला होता. फिफाने घातलेली ही बंदी उठवून पोलंडविरुद्धचा सामना खेळण्याची संधी देण्याची विनंती रशियाच्या फुटबॉल महासंघाने क्रीडा लवादाकडे केली.
मात्र, निकाल पुन्हा त्यांच्या विरोधात देण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलंडचा पात्रतेच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला असून पुढील आठवडयात त्यांचा स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक यांच्यातील विजेत्याशी सामना होईल.
मग अंतिम सामना जिंकणारा संघ या वर्षांअखेरीस कतार येथे होणाऱ्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरेल. पोलंड, स्वीडन आणि चेक प्रजासत्ताक या तिनही संघांनी रशियाविरुद्ध सामने खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे फिफा कठोर निर्णय घेणे भाग पडले.