मॉस्को – युक्रेनवर युद्ध लादलेल्या रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे समर्थन केल्ययामुळे रशियाचा ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू सर्गे कार्याकिनवर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) सहा महिन्यांची बंदी घातली आहे.
कार्याकिनने 2016 साली जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीत जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला आव्हान दिले होते. सध्या तो जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानी आहे. त्याने गेल्या काही आठवडयांत युक्रेनवर हल्ला करण्याचा रशियाचा निर्णय योग्य असल्याचे आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर म्हटले होते. त्यामुळे त्याच्यावर बरीच टीकाही झाली. आता कार्याकिनवर फिडेनेही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्याकिनने फिडेच्या आचारसंहितेच्या कलम 2.2.10 चे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्याच्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली असून या काळात त्याला फिडेच्या कोणत्याही स्पर्धामध्ये खेळता येणार नाही. ही बंदी 21 मार्च 2022 पासून लागू झाली आहे, असे फीडेने म्हटले आहे. कार्याकिनला या निर्णयाला आव्हान देण्यासाठी 21 दिवसांचा कालावधीही देण्यात आला आहे.
कार्याकिन आता रशियाकडून खेळत असला, तरी 2009 सालापर्यंत तो युक्रेनचे प्रतिनिधित्व करत होता. त्यामुळे त्याने रशियाच्या कृतीचे समर्थन केल्याचे अनेकांना आश्चर्य वाटले. रशियाचा आणखी एक ग्रॅंडमास्टर बुद्धिबळपटू सर्गे शिपोव्हवर मात्र फिडेने बंदी घातलेली नाही. शिपोव्हने रशियाचे समर्थन केले असले, तरी त्याने केलेली विधाने ही कार्याकिनपेक्षा काहीशी वेगळी होती, असे फिडेकडून सांगण्यात आले.