– शुभांगी भोसले
मराठी चित्रपटाला सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणजे दादा कोंडके. 14 मार्च हा मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते दादा कोंडके यांचा स्मृतिदिन. आज दादांच्या पुण्यतिथीनिमित्त…
मराठी चित्रपटसृष्टीतील दादा कोंडके हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. विनोदावर आधारित चित्रपटांमुळे कष्टकरी, सामान्य जनतेने त्यांच्या चित्रपटांना भरभरून दाद दिली आणि त्यामुळेच दादांची कारकीर्द यशस्वी ठरली. ‘सोंगाड्या’ ही दादांची पहिली निर्मिती. या चित्रपटातील त्यांच्या ‘नाम्या’च्या भूमिकेने त्यांच्या जीवनाला खर्या अर्थाने वळण मिळाले. या भोळ्या ‘नाम्या’ने दादांना रातोरात यशाच्या शिखरावर नेऊन तर ठेवलेच, त्याचबरोबर हा भोळा नामा ग्रामीण जनतेला इतका भावला की त्यांना तो आपल्यातीलच वाटला. दादांनीही आपली उभी हयात त्याच ‘नाम्या’ सारखी साधेपणाने घालविली.
8 ऑगस्ट 1932 रोजी जन्म झालेल्या कृष्णा ऊर्फ दादा कोंडके यांनी मराठी वगनाट्यातून व चित्रपटांतून अभिनय केला. द्विअर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयाबरोबरच त्यांनी मराठी, हिंदी व गुजराथी चित्रपटांची निर्मितीही केली. वसंत सबनीस लिखित ‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकामुळे ते अभिनेता म्हणून प्रसिद्धीस आले. 1969 मध्ये भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटातील दादांवर चित्रित झालेले ‘जीवा शिवाची बैल जोडी’ हे गाणे आजही मोठ्या आवडीने ऐकले जाते. ‘तांबडी माती’ पाठोपाठ आलेल्या सोंगाड्या (1971)ने दादांचे संपूर्ण जीवनच बदलून टाकले. ‘सोंगाड्या’ ही त्यांची पहिली निर्मिती होती. त्या नंतर दादांनी मागे वळून पाहिलेच नाही.
स्वत:च्या कामाक्षी प्रॉडक्शन या चित्रपट निर्मिती कंपनीतर्फे दादांनी 4 हिंदी व 1 गुजराथी चित्रपटासह एकूण 16 चित्रपटांची निर्मिती केली. एकटा जीव सदाशिव (1972), आंधळा मारतो डोळा (1973), पांडू हवालदार (1975), तुमचं आमचं जमलं (1976), राम राम गंगाराम (1977), बोटं लावीन तेथे गुदगुल्या (1978), ह्योच नवरा पाहिजे (1980), आली अंगावर (1987), मुका घ्या मुका (1988), पळवा पळवी (1990), येऊ का घरात (1992) व सासरचे धोतर (1994) असे एकामागून एक सरस चित्रपट त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शनने प्रदर्शित केले.
राजकपूर, यश चोप्रा, सुभाष घई आदींचे बिग बजेट चित्रपटसुद्धा काहीवेळा तिकीट खिडकीवर कोसळले. तथापि सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपटांच्या निर्मितीमुळे त्यांची मात्र गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नोंद झाली. दादा आपल्या सहकलाकारांवर विश्वास टाकत. त्यांच्या कामाक्षी प्रॉडक्शन टीममध्ये वर्षानुवर्षे उषा चव्हाण या अभिनेत्री, राम लक्ष्मण ह्यांचे संगीत, महेंद्र कपूर व उषा मंगेशकर हे पार्श्वगायनासाठी होते. कुठल्याही ‘क्विझ’ कार्यक्रमात यावर प्रश्न विचारल्यास बेधडक हीच उत्तरे द्यावीत. लोंबणार्या नाडीची सैलसर अर्धी चड्डी, द्विअर्थी संवाद आणि नायिकेशी लगट करण्यावरून त्यांच्यावर नेहमीच टीका झाली.
मात्र, दादांनी मिल-मजूर, शेतकरी, रस्त्यावरील लोक आदी सर्वसामान्य लोकांच्या मनोरंजनाचाच विचार करून त्यांच्याच जीवनाशी संबंधित मुद्द्यांवर चित्रपटांची निर्मिती केली. त्यांच्या ‘सोंगाड्या’मुळे पांढरपेशा वर्गही ‘काय गं सखू’ हे गीत गुणगुणू लागले. दादांच्या चित्रपटांना घाबरून त्या काळी अनेक बड्या हिंदी चित्रपट निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांचे प्रदर्शन पाच ते सहा महिने उशिरा केले होते. दादांच्या चित्रपटांचा करिश्माच असा होता.
‘एकटा जीव सदाशिव’मुळे राजकपूर यांना ‘बॉबी’चे प्रदर्शन पाच महिने लांबवावे लागले, तर ‘पांडू हवालदार’मुळे कधी नव्हे ते जेम्स बाँडचा सिनेमा महाराष्ट्रात चालला नाही. दादांचा आलेख मात्र चढत गेला. दादांची संपूर्ण कारकीर्द सेन्सॉरशी खटके, राजकीय बांधिलकी, त्यांचे व्यक्तिगत आयुष्य या कारणांनी वादग्रस्त ठरली. एका चित्रपटासंदर्भात सेन्सॉरच्या महिला अध्यक्षांनी चित्रपटातील ‘सामान’ या शब्दावर द्विअर्थी म्हणून आक्षेप घेतला; पण दादांनी चाणाक्षपणे त्यांना या शब्दाचा दुसरा अर्थ विचारून निरुत्तर केले. सेन्सॉरच्या दंडेलीपुढे नमते न घेण्याची प्रवृत्ती असो किंवा नियमाविरुद्ध जाण्याची खुमखुमी, शिवसेनेशी असलेली त्यांची बांधिलकी, त्यांचे प्रणय, त्यांचे व्यक्तिगत आयुष्य ते मृत्यूनंतर उठलेले वाद हे एका वादग्रस्त चरित्राचे पैलू असावेत.
यशाच्या शिखरावर असतानाही पाय जमिनीवर ठेवून आपल्या चाहत्यांमध्ये नेहमीच मिसळणार्या दादांनी ज्यावेळी दूरदर्शन खेडोपाडी पोहोचले नव्हते त्या काळात दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी सिनेमागृहात येणार्यांना पोटभरून हसविले. 14 मार्च 1998 रोजी पहाटे 3.30 वाजता रमा निवास या दादरच्या निवासस्थानी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने प्राणोत्क्रमण झाले. अशा या अष्टपैलू कलाकाराला मानाचा मुजरा!