Hockey India Senior Women’s Hockey – गतविजेता हॉकी मध्य प्रदेशने छत्तीसगड हॉकीवर ८-० अशी मात करताना १४ व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजयी सुरुवात केली आणि स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखली. हॉकी बंगालने गुजरातचा २८-० असा धुव्वा उडवला. झारखंड, कर्नाटकनेही विजयी सलामी दिली.
नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर सुरू झालेल्या स्पर्धेत हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशला १३-० असे हरवले. तामिळनाडूने तेलंगण हॉकीवर २-० अशी मात केली. हॉकी कर्नाटकने हॉकी उत्तराखंडला ६-० असे रोखले.
पहिल्या दिवसातील पहिल्या सामन्यात ए गटातील हॉकी मध्य प्रदेशने हृतिका सिंगच्या चार गोलच्या छत्तीसगड हॉकीला ८-० असे पराभूत केले. हृतिकाने ११ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलामध्ये रुपांतर करून गोलखाते उघडले. त्यानंतर १७ व्या, २२ व्या आणि ३३ व्या मिनिटाला गोल करताना गोलचौकार पूर्ण केला. मध्यंतराला ४-० अशी आघाडी घेणार्या हॉकी मध्य प्रदेशने उत्तरार्धात आणखी तितक्याच गोलांची भर घातली. प्रीती दुबे (२४ व्या मिनिटाला), ऐश्वर्या चव्हाण (४६ व्या मिनिटाला), अंजली गौतम (४८ व्या मिनिटाला) आणि साधना सेंगरने (५७ व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करताना विजयाला हातभार लावला.
सी गटात हॉकी झारखंडने हॉकी आंध्र प्रदेशवर १३-० असा सहज विजय मिळवला. त्यात आठ खेळाडूंच्या गोलचा समावेश आहे. संगीता कुमारीचे (२४, ५४, ४७ आणि ६० व्या मिनिटाला) सर्वाधिक चार गोल आहेत. महिमा टेटेने चौथ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. त्यानंतर, दीपिका सोरेंग (१८ आणि ३५ व्या मिनिटाला), दीप्ती टोप्पो (२४ व्या मिनिटाला, ३२ व्या मिनिटाला) तसेच सलीमा टेटे (२५ व्या), रजनी केरकेट्टा (३५ व्या मिनिटाला), दिप्ती कुल्लू (३८ व्या मिनिटाला) आणि निक्की कुल्लू (३९ व्या मिनिटाला) यांचा समावेश आहे.
तिसरा सामना एकतर्फी झाला. एच गटात हॉकी बंगालने हॉकी गुजरातचा २८-० असा धुव्वा उडवताना दिवसातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली.
होरो संजनाने (१२,२०, ३४, ४७, ४८, ५३, ५४, ५५ व्या मिनिटाला) तब्बल आठ गोल करताना त्यात सर्वाधिक वाटा उचलला. सुष्मिता पन्ना हिने (१३, २१, ३६, ५५, ५७ व्या मिनिटाला) पाच आणि मॅक्सिमा टोप्पो हिने (२४, २८, ४४ आणि ५८ व्या मिनिटाला) चार गोल करताना तिला सुरेख साथ दिली. मोनिका नाग हिने (७ आणि १५ व्या मिनिटाला) पहिला गोल केला. सुश्मिता गंधाने (२३ आणि ५५ व्या मिनिटाला), लिली ओरम (३२, ३३ आणि ४५ व्या मिनिटाला), कविता (४० आणि ५९ व्या), निधी साहनी (४१ व्या मिनिटाला) आणि अंजना डुंगडुंग (४९ व्या मिनिटाला) यांनीही विजयाला हातभार लावला.
एच गटातील सामन्यात, तामिळनाडू हॉकी युनिटला तेलंगण हॉकीने २-१ असे झुंजवलेे. सोनिया एस हिने २३ व्या मिनिटाला पहिला गोल केला. तेलंगणकडून वर्शिथा मुप्पाला (३९ व्या) हिने बरोबरी साधून दिली. मात्र, सोनियाने ५१ व्या मिनिटाला वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल करताना तामिळनाडूला जिंकून दिले.