पुणे – समग्र शिक्षा अंतर्गत समावेशित शिक्षण उपक्रमातील 1 हजार 775 विशेष शिक्षकांच्या सन 2022-23 व 2023-24 या दोन वर्षाच्या मानधन वाढीतील फरकाची रक्कम अदा करण्यासाठी 6 कोटी 39 लाख इतका निधी वितरीत करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सन 2017-18 या आर्थिक वर्षात विशेष शिक्षकांना 21 हजार 500 रुपये प्रतिमाह इतके मानधन मंजूर करण्यात आले होते. मात्र, समग्र शिक्षाच्या सुधारित आराखड्यानुसार या विशेष शिक्षकांचे मानधन सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून 20 हजार रुपये प्रतिमाहच्या मर्यादेत निश्चित करण्यात आले होते.
सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून विशेष शिक्षकांना 1 हजार 500 रुपये प्रतिमाह इतके मानधन कमी मिळत होते. या मानधन वाढीच्या फरकाची रक्कम राज्य निधीमधून देण्याचा व त्यासाठीचा निधी दरवर्षी राज्य हिश्श्याच्या प्रमाणाबाहेर उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर सादर करण्यात आला होता. त्यास मंत्रीमंडळाने मान्यताही दिली आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या महाराष्ट्र राज्य प्रकल्प संचालकांना शिक्षकांच्या मानधनाच्या फरकाचा निधी वितरीत होणार आहे. त्यानंतर राज्य प्रकल्प संचालकांकडून हा निधी प्राथमिक शिक्षण संचालकांकडे हस्तांतरित करावा लागणार आहे. वित्त विभागाच्या अटींची पूर्तता करूनच हा निधी खर्च करावा लागणार आहे.