अयोध्या – रामजन्मभूमीवर राम मंदिर उभारणीचे काम लवकर सुरू व्हावे, यासाठी अयोध्येत नियोजित राममंदिराच्या ठिकाणी आज एका विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पूर्वी घोषित केल्याप्रमाणे राममंदिरच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला आजपासून सुरुवात झाली नाही.
मंदिराच्या नियोजित ठिकाणी कुबेर टिळा देवस्थानात महंत कमल नयन दास यांच्या उपस्थितीत रुद्राभिषेक करण्यात आला. मंदिराच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केल्याचे देवस्थानाच्यावतीने सांगण्यात आले. कमल नयनदास हे राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष असलेल्या नृत्य गोपाल दास यांचे प्रवक्ते आहेत.
बुधवारी रुद्राभिषेकानंतर लगेचच राम मंदिराच्या पायाभरणीला प्रारंभ होईल, असे त्यांनी सोमवारी जाहीर केले होते. मात्र आज ते महंत नृत्य गोपाल दास यांच्यावतीने पूजा करण्यासाठी गेले, तेंव्हा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टपैकी कोणीही सदस्य उपस्थित नव्हते.
आपल्यासमवेत नृत्य गोपाल दास यांचे धार्मिक प्रतिनिधी आणि मणी राम छावी मंदिराचे पूजारी होते. त्यांच्या शिष्यांसमवेत आपण भगवान शंकराला रुद्राभिषेक आणि पूजा केली, असे कमल नयनदास यांनी सांगितले.