नवी दिल्ली – भारतात घातपाती कारवाया घडवण्यासाठी अल कायदाशी संलग्न असलेल्या “अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनंट’ या संघटनेने आता इंटरनेटवरून आपला विषारी प्रचार करायला सुरुवात केली आहे. समविचारी गटांशी संधान साधणे आणि युवकांना आपल्या घातपाती कारवायांमध्ये आकृष्ठ करून घेण्यासाठी वेबसाईटचा आधार घेतला जातो आहे. यातून मिळणाऱ्य युवकांना सरकारी संस्था, संरक्षण संस्था, उद्योग आणि हिंदुत्ववादी नेत्यांना लक्ष्य करण्याचा या संघटनेचा डाव आहे. त्यासाठी ज्या वेबसाईट केल्या जात आहेत, त्यात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी इस्लामी विचारवंतांना सहभागी करून घेतले जाते आहे. त्यांच्या लेखनाला आणि विचारांना इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून प्रसिद्धी दिली जाऊ लागली आहे. असे वृत्त गोपनीय सूत्रांच्या हवाल्याने एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.
“एक्यूआयएस’च्या बांगलादेशमधील शाखेने अलीकडेच अशा कित्येक भाषणांचे व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड केले आहेत. जागतिक जिहादच्या अनुषंगाने एकट्याने घातपाती ोतहल्ले कसे करावेत, याची सविस्तर आखणी आणि अंमलबजावणी कशी करावी याचे पूर्ण मार्गदर्शनच या व्हिडिओंमधून केले गेले आहे. असे व्हिडिओ सात्यत्याने अपलोड केले जातच असतात. “लोन वुल्फ’ अर्थात एकट्याने करायच्या कारवायांबाबत या व्हिडिओंमधून चिथावणी आणि मार्गदर्शनही केले जात असते.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींमध्ये हल्ल्याच्यावेळी अजिबात घाबरून जाऊ नये आणि नियोजनानुसार आपले कार्य पार पाडावे, अशी सूचना केली गेली आहे. या व्हिडिओंबद्दलची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणांनी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाड केली आहे. 2014 मध्ये अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याने “अल कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ची स्थापना केली होती आणि भारतीय वंशाच्या आसिम उमर याला या संघटनेचा प्रमुख नियुक्त केले हे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, म्यानमार आणि बांगलादेशातील सरकारांबरोबर संघर्ष हे या संघटनेचे प्रमुख काम आहे.