साउथ सुपरस्टार नागार्जुनने रविवार, 29 ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. या खास दिवशी नागार्जुनने त्याच्या चाहत्यांना एक विशेष भेट दिली आहे. दिग्दर्शक प्रवीण सत्तारू यांच्या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे.
या चित्रपटाचे नाव “घोस्ट’ असे निश्चित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या या पोस्टरवर नागार्जुन हा रक्ताने माखलेली तलवार घेऊन शत्रूंचा नाश करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. या पोस्टरमध्ये नागार्जुनचा जबरदस्त अंदाज दिसत आहे. यात नागार्जुनसोबत काजल अग्रवाल ही मुख्य नायिकेची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटाचे शूटिंग सध्या हैदराबाद येथे सुरू आहे. श्री वेंकटेश्वर सिनेमाज एलएलपी आणि नॉर्थस्टार एंटरटेन्मेंट बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे. वर्कफ्रंटबाबत
सांगायचे झाल्यास नागार्जुन लवकरच “घोस्ट’ चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय तो आपला मुलगा नागा चैतन्यसह “बंगाराजू’मध्येही मुख्य भूमिका साकारत आहे. तसेच बॉलीवूडमधील “ब्रह्मास्त्र’ चित्रपटातूनही तो चाहत्यांच्या भेटीस येत आहे.