धनत्रयोदशी विशेष… : धन्वंतरी जयंती महत्व आणि आयुर्वेद धन्वंतरी

धन्वंतरी देवाला आयुर्वेदाचे आराध्य दैवत मानले जाते. इंद्र जेव्हा असुरांना घेऊन सागर मंथन करत होते, तेव्हा चौदा रत्ने निघाली. त्यापैकी एक म्हणजे विष्णूंचा अवतार धन्वंतरी होय. धन्वंतरी अमृत घेऊन आले होते. धन्वंतरी वैद्यराज असून त्यांच्या हातातील कमंडलू अमृताने भरलेला आहे, अशी कल्पना आहे. त्यांच्या कृपेमुळे वेगवेगळ्या औषधी देवांना मिळाल्या. त्यामुळे त्यांना देवांचा वैद्य म्हणून ओळखले जाते. ज्यामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत सुरू आहे, त्या धनाची या दिवशी पूजन केले जाते. येथे धन म्हणजे शुभलक्ष्मी. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. धणे व गूळ प्रसाद म्हणून देतात.

प्राणहरण करण्याचे काम यमाकडे आहे. मृत्यू कोणालाच चुकत नाही; पण अकाली मृत्यू येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा दिवा करून आणि त्यात तेल घालून तो घराबाहेर दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा! सर्वांच्या शरीराबरोबर मनेही आरोग्यदायी राहोत, हीच सदिच्छा!

समुद्र मंथनातून बाहेर येताना धन्वंतरींच्या चार हातांमध्ये चार गोष्टी होत्या, त्या म्हणजे अमृतकलश, आयुर्वेद, जळू, शंख आणि चक्र. म्हणूनच धन्वंतरींना वैद्य म्हणून मानले जाते. त्यांनीच या भूतलावर आयुर्वेद आणला, अशी श्रद्धा आहे. यातील जळूचा वापर रक्‍तमोक्षण या पंचकर्मातील एका चिकित्सेसाठी केला जातो, ज्याद्वारे रक्‍तातील दोष बाहेर काढला जाऊन काशी मुक्‍तीस मदत होते. साधारण त्वचा विकारात जळूचा वापर वर्णिलेला आहे. धन्वंतरी जयंतीला सर्वांना धणे व गुळाचा प्रसाद दिला जातो. धणे पचनाला मदत करणारे, भूक वाढवणारे, उलटीमध्ये गॅसेस कमी करण्याकरिता आणि अंगातील उष्णता मूत्राद्वारे बाहेर काढण्यासाठी अतिशय उपयुक्‍त आहे.

धन्वंतरी जयंतीने दिवाळीची सुरुवात होते. यावेळी हिवाळा ऋतूची सुरुवात झालेली असते. या ऋतूत त्वचा रुक्ष होते. त्यामुळे अभ्यंगस्नान (अंगाला तेल लावून स्नान) केल्याचा चांगला उपयोग होतो. आंघोळीकरिता उटण्याचा वापर वर्णिलेला आहे. या काळात त्वचेला तजेला येण्यासाठी याचा उपयोग होतो. येथून पुढील चार महिने अभ्यंगस्नान व उटण्याचा वापर अतिशय फलदायी असतो.
कोजागिरी पौर्णिमेनंतर रम्य वातावरण तयार होते. चंद्रप्रकाश एकदम शीतल असतो. यावेळी औषधी गुणधर्म अत्त्युत्तम मात्रेत वनस्पतींमध्ये असतात. निसर्गातील उपलब्ध पाणीसुद्धा शुद्ध असते. म्हणून औषध निर्मितीच्या परंपरेनुसार दिवाळी पाडव्यापर्यंत औषधी निर्माण करण्याचे कार्य वैद्य करतात. या काळात बनवलेली औषधे अत्त्युत्तम दर्जाची असतात.

हा देवांचा वैद्य होय. भारतामध्ये अश्‍विन कृष्ण त्रयोदशीला, म्हणजे धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. यालाच आता राष्ट्रीय आयुर्वेदिक दिवस म्हणून ओळखले जाते. सागर मंथनाच्या वेळी धन्वंतरी अमृत घेऊन बाहेर आले होते, अशी आख्यायिका आहे.

– सुयोग दांडेकर 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.