फलटण -करोना हॉटस्पॉट असलेल्या “वडले’ गावासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष मदतीचे वाटप करण्यात आले. वडले गाव सील केल्यामुळे गावासाठी मागणीनुसार आरोग्यासाठी आवश्यक तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचा या मदतीमध्ये समावशे आहे.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधे, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य सेविका यांच्यासाठी एकूण 12 पीपीइ कीटस्, गाव निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराइड 25 लिटर, हॅंड सॅनिटायझरच्या 650 बाटल्या आणि जादा पाच लिटरचे 10 कॅन हॅंड सॅनिटायझर, 1300 वॉशेबल मास्क, 30 कुटुंबीयांना तांदूळ, गहू आणि भाजीपाला समावेश असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे किट आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या वर्गणीतून सर्व कुटुंबीयांना इम्युनिटी बुस्टर करोना प्रतिबंधात्मक आर्सेनिकम 30 होमियोपॅथी गोळया या सर्व अत्यावश्यक वस्तूंचे वाटप पंचायत समिती सदस्य विश्वजितराजे नाईक निंबाळकर आणि बाजार समितीचे व्हाइस चेअरमन भगवानराव होळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समिती सचिव शंकरराव सोनवलकर, सरपंच अनुराधा सोनवलकर, माजी सरपंच व विद्यमान सदस्य पोपटराव सोनवलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शंकरराव सोनवलकर यांच्यासमवेत वडले गावाला भेट दिली. लोकांचे मनोधैर्य वाढविले. स्वतःची व कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करून गावाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पोपटराव सोनवलकर यांनी आभार मानले.