मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने अखेर भारताची बॅडमिंटनपूट सायना नेहवालची माफी मागितली आहे. सिद्धार्थने सायना नेहलावर टीका करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, आपल्या ‘त्या’ टीकेसंबंधी स्षष्टीकरण देत बाजू मांडल्यानंतर आता सिद्धार्थने ट्विटरवरच जाहीर माफी मागितली आहे.
सिद्धार्थने ट्विटरवर पत्र पोस्ट केले असून त्यात म्हटलं आहे की, “प्रिय सायना, काही दिवसांपूर्वी तुझ्या एका ट्विटला उत्तर देताना लिहिलेल्या त्या कठोर विनोदासाठी मी माफी मागत आहे. मी अनेक मुद्द्यांवर तुझ्याशी असहमत असू शकतो पण तुझं ट्विट वाचल्यानंतरची नाराजी किंवा राग व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आलेली भाषा आणि स्वर याचं स्पष्टीकरण असू शकत नाही. मी नक्कीच यापेक्षा जास्त चांगला व्यक्ती आहे याची मला जाणीव आहे. त्या विनोदाबद्दल स्पष्टीकरण द्यायचं झाल्यास तो खूप चांगला विनोद नव्हता. तो योग्यप्रकारे मांडता आला नाही याबद्दल माफी”.
Dear @NSaina pic.twitter.com/plkqxVKVxY
— Siddharth (@Actor_Siddharth) January 11, 2022
“मी आग्रहाने सांगू इच्छितो की माझ्या शब्दाचा खेळ आणि विनोदाचा कोणताही दुर्भावनापूर्ण हेतू नव्हता. मी एक स्त्रीवादाचा समर्थक आहे आणि मी खात्री देतो की माझ्या ट्विटमध्ये लिंगभेद नव्हता तसंच एक स्त्री म्हणून तुझ्यावर हल्ला करण्याचा नक्कीच कोणताही हेतू नव्हता. तू हे सर्व मागे सोडून माझं हे पत्र स्वीकारशील अशी आशा आहे. तू नेहमीच एक चॅम्पियन राहशील. प्रामाणिकपणे, सिद्धार्थ,” असेही त्याने या पत्रात म्हटले आहे.
बॉलिवूड आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेला अभिनेता सिद्धार्थने स्टार सायना नेहवालवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने हा वाद सुरु झाला होता. झालं असं होतं की, पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेतील त्रुटींसंबंधी ट्वीट करताना भाजपा सदस्य असणाऱ्या सायना नेहवालने “कोणतेही राष्ट्र स्वत:च्या पंतप्रधानांच्या सुरक्षेशी तडजोड करत असेल तर ते सुरक्षित असल्याचा दावा करू शकत नाही. मी अराजकवाद्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करते,” असे म्हटले होते.
सायना नेहवालच्या या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थने दुहेरी अर्थाचा शब्द वापरला होता. “S**e ck जागतिक विजेती नशिब आपल्याकडे भारताचे संरक्षण करणारे आहेत. #Rihanna तुला लाज वाटली पाहिजे.” असे अभिनेता सिद्धार्थने म्हटले होते. त्याच्या या ट्वीटवरुन वाद सुरु झाला होता. प्रकरण इतकं वाढलं की राष्ट्रीय महिला आयोगानेही याची दखल घेत गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते.