इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल
साउदम्पटन :- इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत तुल्यबळ असलेल्या मॅंचेस्टर सीटी क्लबला पराभवाचा धक्का बसला. साउदम्पटन संघाने या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवताना मॅंचेस्टर सीटीचा 1-0 असा पराभव केला. चे ऍडम्सचा गोल या सामन्यात निर्णायक ठरला.
या स्पर्धेचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेल्या मॅंचेस्टर सीटीला पराभवाचा सामना करावा लागला तोदेखील केवळ एकदाच बचावात झालेल्या चुकीमुळे. चे ऍडम्सने या स्पर्धेतील सर्वात नेत्रदीपक गोल केला व संघाला स्वप्नवत विजय मिळवून दिला. पहिल्याच हाफमध्ये 16 व्या मिनिटाला ऍडम्सने हा गोल केला आणि त्यानंतर संपूर्ण सामन्यात मॅंचेस्टरवर वर्चस्व राखले. त्यांना एकही गोल करण्याची संधी दिली नाही. त्यांचा बचाव इतका अभेद्य होता की मॅंचेस्टरला दोन वेळा फ्री किक मिळूनही त्याचा लाभ घेता आला नाही.
या सामन्यात मॅंचेस्टरला 13 कॉर्नर मिळाले. मात्र, त्यातील एकाचेही गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. या स्पर्धेच्या गुणतालिकेत लिव्हरपूल 89 गुणांसह आघाडीवर आहे. मॅंचेस्टरला या सामन्यातील पराभवामुळे 66 गुणांसह दुसऱ्याच स्थानावर समाधान मानावे लागले असून पुढील लढती जिंकल्या तरच त्यांना विजेतेपद मिळविण्याची संधी आहे.