नवी दिल्ली – दक्षिण कोरियाने आपला दुसरा हेरगिरी विषयक उपग्रह प्रक्षेपित केला आहे. उत्तर कोरियाने या वर्षभरात अनेक टेहळणी विषयक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना जाहीर केल्यानंतर लगेचच दक्षिण कोरियाने या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे.
दोन्ही कोरियांनी गेल्याच वर्षी आपले पहिले हेरगिरी उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. उत्तर कोरियाने नोव्हेंबर महिन्यात तर दक्षिण कोरियाने डिसेंबर महिन्यात आपापल्या उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. एकमेकांच्या लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत.
दक्षिण कोरियाचा दुसरा हेरगिरी उपग्रह काल संध्याकाळी फ्लोरिडामधील केनेडी अवकाश केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आला. नियोजनानुसार हा उपग्रह रॉकेटपासून वेगळा झाला असल्याचे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दक्षिण कोरियाने २०२५ पर्यंत आणखीन ५ उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी स्पेसएक्स बरोबर एक करार केला आहे.
हेरगिरीच्या उपग्रहांचे नेटवर्क उभे करण्यासाठी उत्तर कोरियाकडूनही वेगाने तंत्रज्ञान विकसित केले जाते आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेकडून असलेल्या धोक्यांची पूर्वकल्पना मिळण्यासाठी उत्तर कोरिया या उपग्रहांवर अवलंबून असणार आहे.