नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला यांनी कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याचे कौतुक केले आहे. कॉंग्रेसचा जाहीरनामा देश मजबूत करणारा आणि देशाचे धर्मनिरपेक्षतेचे स्वरूप कायम ठेवणारा आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या जाहीरनाम्यावर पंतप्रधान मोदींनी केलेली टीकाही त्यांनी फेटाळून लावली आहे. जाहीरनाम्याचे प्रत्येक पान देशाला तोडणारे आहे असे पंतप्रधानांनी म्हटले होते. त्यांचा हा दावा फेटाळताना अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की जे असे म्हणतात त्यांनीच देशाचे तुकडे करणारे धोरण अवलंबले आहे.
उलट कॉंग्रेसचा जाहीरनामा देश मजबूत करणारा आहे असे मला वाटते असे ते म्हणाले. आज ते येथे पत्रकारांशी बोलत होते. राजस्थानच्या अजमेरमध्ये एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर ही टीका केली होती.
हा जाहीरनामा हे प्रतिबिंबित करतो की काँग्रेसची विचारसरणी स्वातंत्र्यपूर्व काळात मुस्लिम लीगच्या विचारसरणीसारखी आहे असे मोदी म्हणाले होते.