नागपूर – अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे उभारण्यात येणार्या मराठी भाषा विद्यापीठासाठी भूमी अधिग्रहणाच्या कार्यवाहीला वेग द्यावा, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था (मॉरिस कॉलेज) येथे आढावा बैठक घेण्यात आली. वेळी ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठी भाषा विद्यापीठ सुरू व्हावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होती. तिचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने समिती गठित केली. त्या समितीने अहवाल सादर केला आहे. मराठी भाषा विद्यापीठात विविध ज्ञानशाखा, शिक्षणक्रम आणि अभ्यासक्रम राबविताना विद्यार्थी रोजगारक्षम कसे होतील याचाही विचार करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी जमीन अधिग्रहणाबाबत कटियार यांनी पर्याय सुचविले. त्यापैकी ई – क्लास जागा तसेच वनविभागाची जागा अनुकूल नसल्याबाबत कळविण्यात आले. त्यामुळे मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा अधिग्रहण करण्याबाबत नियम व अटी तपासून उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर करण्याचे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले.
उपलब्ध जागा ज्या विभागाची आहे त्या विभागाकडून ना हरकत मिळवण्याची प्रक्रिया करण्यात यावी. तसेच जागा अधिग्रहणाबाबत शेतकऱ्यांना अवगत करावे. भूमी अधिग्रहणाची कार्यवाहीला वेग द्यावा. मराठी भाषा विद्यापीठासाठी जागा मिळविण्यासाठी शोध घेऊन अहवाल सादर करावा . जागा अधिग्रहित करून जून २०२४ पासून विद्यापीठ सुरु करण्यात येईल, असे पाटील यावेळी म्हणाले.