नवी दिल्ली -कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी परदेशी रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात त्या उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
सोनिया शनिवारी परदेशी रवाना झाल्याची माहिती सुत्राकंडून देण्यात आली. त्या किमान दोन आठवडे देशाबाहेर असतील. संसदेच्या अधिवेशनासाठी 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. परदेशी रवाना झालेल्या सोनियांसमवेत त्यांचे पुत्र राहुल गांधीही आहेत. काही दिवसांनी राहुल परततील. त्यामुळे पहिले काही दिवस राहुलही अधिवेशनाला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती पुढे येत आहे.
परदेशी जाण्यापूर्वी सोनियांनी कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक पातळीवर व्यापक फेरबदल केले. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. अधिवेशनात चांगला समन्वय ठेऊन देशाशी संबंधित महत्वाचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्याचे समजते. करोना संकट, अर्थव्यवस्थेची घसरण आणि भारत-चीन सीमेवरील तणाव आदी मुद्द्यांवरून प्रामुख्याने कॉंग्रेस मोदी सरकारला घेरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.