मुंबई – मुंबईत नियंत्रणात असलेला करोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील मागील काही दिवसांमधील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. मुंबईत दहा दिवसांत डबलिंग रेट 84 वरून 58 दिवसांवर आला आहे.
मुंबईत एकीकडे दररोज करोनाग्रस्त रुग्णांची वाढ होत आहे, तर डबलिंग रेट किंवा रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधीही घसरू लागला आहे. म्हणजेच वेगाने करोनाचे रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत.
गेल्या काही महिन्यात करोना रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी हळूहळू वाढू लागला होता. एक सप्टेंबरपर्यंत करोना रुग्ण दुपटीचा कालावधी 80 ते 100 दिवसांवर स्थिरावला होता. 31 ऑगस्टला तो 84 दिवस इतका होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांत तो घसरून तब्बल 58 दिवसांवर आला आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी 67 दिवस होता.
मागील महिनाभर मुंबईत रोज 1000 ते 1200 या दरम्यान नवीन रुग्ण सापडत होते. मात्र, आता 24 तासांत दीड ते दोन हजारांच्या दरम्यान नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळत आहेत. वाढती करोना रुग्णसंख्या मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी असून मुंबई महापालिकेपुढे पुन्हा आव्हान उभे राहिले आहे.
आणखी 485 पोलीस करोनाबाधित
राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये आणखी 485 पोलीस करोनाबाधित आढळले असून, एका पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता 18 हजार 890 वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 3 हजार 729 जण, करोनामुक्त झालेले 14 हजार 975 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 186 जणांचा समावेश आहे.