समाजाच्या आरोग्याच्या रक्षणासाठी आणखी उपाययोजना सुचवल्या
पंतप्रधानांन पत्र लिहून दिली पाठिंब्याची ग्वाही
नवी दिल्ली – करोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभर लागू केलेल्या लॉकडाऊनचे कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी समर्थन केले आहे. आपला पाठिंबा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे कळवला आहे. या लॉकडाऊनच्या काळामध्ये डॉक्टरांची काळजी घेण्यात यावी तसेच कर्जाची वसुली पुढे ढकलण्यात यावी, अशा काही उपाययोजनाही त्यांनी पंतप्रधानांना सुचवल्या आहेत. “कोविड-19’ची साथ जगभर पसरली असून त्यामुळे सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. भारतातील नागरिकांनाही या विषाणूची बाधा व्हायला लागल्याची भीती निर्माण झाली आहे.
लक्षावधी लोकांचे आयुष्य धोक्यात आहे. विशेषतः आपल्या समाजातील असुरक्षित गटांचे आयुष्य धोक्यात आहे. सर्व समाजाला असलेल्या या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देश एकसंधपणे ठाम उभा आहे, असे त्यांनी पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. पंतप्रधानांनी जाहीर केलेला “लॉकडाऊन’ हे स्वागतार्ह पाऊल आहे, असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.
कॉंग्रेस पक्षाची अध्यक्षा म्हणून आपण या लॉकडाऊनला पूर्ण समर्थन देत असून करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकार घेत असलेल्या सर्व निर्णयांना आपला पाठिंबाच असेल, असे सोनिया गांधींनी म्हटले आहे. डॉक्टर, नर्स आणि आरोग्यसेवकांना वैयक्तिक सुरक्षेच्या उपाययोजना व्हायला हव्यात. या आरोग्यसेवकांना एन-95 मास्क व विषाणूरक्षक सूटही मिळायला हवे. त्याशिवाय आयसीयू आणि व्हेंटिलेटरच्या सुविधेसह तात्पुरत्या आरोग्य केंद्रांचे बांधकाम त्वरित सुरू व्हायला हवे. सर्व आवश्यक फोन नंबरसह अन्य महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचायला हवी. त्यासाठी स्वतंत्र वेबपोर्टल सुरू करायची कल्पना सोनिया गांधींनी सुचवली आहे.
कंपन्यांमधील कामगारांची कपात लक्षात घेता स्वतंत्र मंडळाच्या मार्फत त्यांच्या हिताचा विचार केला जायला हवा. त्यासाठी थेट लाभ हस्तांतरणाची योजना हवी. तसेच शेतकरी आणि नोकरदारांची कर्जवसुली किमान 6 महिने पुढे ढकलली जायला हवी. किमान उत्पन्न हमी योजना राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.