कैरो – इजिप्तची राजधानी कैरोमध्ये अनेक वाहने एकमेकांवर धडकून झालेल्या विचित्र अपघातामध्ये किमान 15 जण ठार झाले आहेत आणि डझनभर आणखी लोक जखमी झाले आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इजिप्तमध्ये रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संध्याकाळी 7 वाजताच सार्वजनिक वाहतूक यंत्रणा बंद झाली. त्यानंतर रस्त्यावर फिरण्यास नागरिकांना पूर्ण मज्जाव करण्यात आला आहे. या संचारबंदीतून केवळ काही निवडक सेवा आणि व्यक्तींनाच वगळण्यात आले आहे.
बुधवारी संध्याकाळी अशाच प्रकारे संचारबंदी लागू करण्यात आल्यानंतर काही मिनी बस, ट्रक आणि कार दक्षिण इजिप्तमधील चेकपॉईंटवर रांगा लागून उभे होते. त्याचवेळी बांधकाम साहित्य लादलेला एक ट्रक भर वेगात या वाहनांच्या ताफ्यामध्ये घुसला, असे अल अहराम या सरकारी वृत्तपत्राने सांगितले. या अपघातात कित्येक वाहने एकमेकांवर धडकली आणि काही वाहनांच्या पेट्रोल टाक्यांचे स्फोटही झाले. प्रत्यक्षात कोणत्या कारणामुळे अपघात झाला, याचा तपास केला जात आहे. इजिप्तमध्ये करोनाची लागण 456 जणांना झाली आहे, तर 22 जण मरण पावले आहेत.