रायपूर (छत्तीसगड) – सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यासाचे वृत्त फेटाळून लावले आहे. “याआधी कधी राजकीय निवृत्ती घेतली, ना यापुढे कधी घेणार आहे, असे म्हणत सोनियांनी आपल्या राजकिय निवृत्तीच्या शक्यता फेटाळून लावल्या.
कॉंग्रेसचे 85वे राष्ट्रीय अधिवेशन छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये सुरु आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (शनिवार) सोनिया गांधींनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा आढावा घेतला. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रे दरम्यान माझी अध्यक्षपदाची इनिंग संपली, ही फार समाधानाची बाब ठरली, असे त्या म्हणाल्या होत्या त्यावरून सोनिया राजकिय निवृत्ती घेणार अशा चर्चांना उधान आले होते.
मार्गदर्शक म्हणून काम करणार
“जेव्हा मी सोनिया गांधींशी माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांबद्दल चर्चा केली, तेव्हा त्यांनी राजकीय संन्यासाचे वृत्त फेटाळून लावले आहे, असे कॉंग्रेसच्या माजी खासदार अलका लांबा यांनी म्हटले. लांबा पुढे म्हणाल्या, अधिवेशनादरम्यान मला त्यांच्यासोबत बोलण्याची संधी मिळाली. मी त्यांना म्हणाले, मॅडम तुमच्या कालच्या वक्तव्याने तुम्ही राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. तेव्हा “मी संन्यास घेणार नाही. मी पक्षाला कायमच मार्गदर्शन आणि आशीर्वाद देत राहाणार आहे,’ असे सोनियांनी उत्तर दिल्याचे लांब यांनी म्हटले आहे.
Madhya Pradesh : वीर सावरकरांना भारतरत्न मिळालेच पाहिजे; मराठी भाषिक इंदूरमध्ये उतरले रस्त्यावर
राहुल गांधींचे कौतुक
सोनिया गांधी यांनी त्यांच्या भाषणात राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत केलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, यात्रा कॉंग्रेससाठी महत्त्वाची ठरली आहे. यात्रेने दाखवून दिले की, भारतीय नागरिकांना एकमेकांबद्दल आदर, सद्भाव, आणि समानतेची अपेक्षा आहे. यात्रेसाठी कठोर मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे सोनियांनी अभिनंदन केले आणि राहुल यांच्या कामाचे कौतुक केले. यात्रेत सहभागी देशवासियांचेही त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.