नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून आज दुसऱ्यांदा चौकशी सुरु आहे. दरम्यान, त्यांच्यावर सुरु असलेल्या कारवाईवरून काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान राजधानी दिल्लीमधील आंदोलनात सहभागी झालेले राहुल गांधी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला पोलिसांनी राहुल गांधींना घेरले आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात गेल्या महिन्यात राहुल गांधी यांच्यापाठोपाठ सोनिया गांधी यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, सोनिया गांधी यांना करोनाची लागण झाल्याने त्यांची चौकशी लांबणीवर गेली होती. त्यानंतर २१ जुलैला ईडीने सोनिया गांधींची दोन तास चौकशी केली होती. दरम्यान, आजच्या कारवाईच्या विरोधात राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना घेरले होते.
Pictures from earlier today when Rahul Gandhi, along with other MPs of Congress, was detained by Delhi Police from Vijay Chowk.
(Source: Congress) pic.twitter.com/4KhU1CfauI
— ANI (@ANI) July 26, 2022
तपास यंत्रणांकडून विरोधी पक्षातील नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याविरोधात तसेच महागाई, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधी आंदोलन करत होते. जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेले.
पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी राजे असून, देशात पोलिसांचं राज्य आहे अशी टीका केली. पोलिसांनी आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांवर कारवाई केली तेव्हा राहुल गांधी एकटेच होते. राहुल गांधींवर कारवाई करायची की नाही याबाबत पोलिसांमध्ये चर्चा सुरु होती.