-शर्मिला जगताप
प्रत्येक व्यक्तीत काहीतरी कलागुण असतोच. एखाद्याकडे काही गुणांची कमतरता असेल म्हणून त्यांस दूषणे दिली जातात. मात्र, त्याच्या इतर कलागुणांची कदर केली जावी. बऱ्याचवेळा एखादी व्यक्ती एखाद्या कामात हुशार असेल तर ती बाकी सगळ्याच कामात हुशार असेल असेही नाही. बऱ्याचवेळा आपल्याला माहिती नसलेले काम करावयास घेतल्यास आपलीच फजिती होते. चित्रकाराने जर मूर्ती करायला घेतली आणि मूर्तीकाराने जर चित्र काढायला घेतले तर त्यातून नवी कलाकृर्ती निर्माण होणार आहे का?
याबाबत एक मजेशीर गोष्ट सांगितली जाते. एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला असता त्याला एक भलेमोठे माकड झाडाच्या एका नाजूक फांदीवर बसलेले दिसले. ते माकड एवढे मोठे असूनही एवढ्या लहान फांदीवर आपला तोल सांभाळून कसे बसले असेल, असा राजाला प्रश्न पडतो. या माकडाचीच आपण शिकार करावी असे ठरवून राजाने धनुष्याला बाण लावून माकडावर निशाणा साधला. मात्र, चपळ माकडाने राजाचा निशाणा चुकवला.
आपण एवढे निशाणेबहाद्दूर असूनही या माकडाने आपला निशाणा चुकवल्याचे पाहून राजाने आणखी त्वेषाने माकडावर बाण चालवले. मात्र, प्रत्येक बाण त्या माकडाने या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारून लीलया चुकवले. माकडाचा पराक्रम पाहून राजा भलताच खूश झाला व असा पराक्रमी माकड आपल्या दरबारी असावा असा राजाने विचार केला. राजाने त्याच्या सैन्याला माकडाला पकडून आणण्याचा आदेश दिला. सैन्यांनी त्या माकडाला जाळ्यात अलगद पकडले आणि राजमहाली घेऊन आले.
दुसऱ्या दिवशी राजाने त्या माकडाला स्वतःचा अंगरक्षक बनवल्याची घोषणा दिली. अंगावर भारी वस्रे आणि कमरेला तलवार असा माकडाचा नवा अवतार पाहून अष्टप्रधान मंडळाने राजाला वेळीच सावध केले. मात्र, राजा त्या माकडावर भलताच खूश होता. एके रात्री राजा झोपला असताना माकड राजाच्या शेजारी बसून पहारा देत होता. तेवढ्यात एक माशी राजाच्या नाकावर येऊन बसली. माकडाने त्वरित तलवार त्या माशीवर चालवली. माशी उडून गेली मात्र राजाचे नाक कापले गेले. राजाला आपली चूक उमगली. राजाने सैन्याला त्या माकडाला जंगलात सोडून देण्याचा आदेश दिला.
असाच एक किस्सा इंग्रज मॅकिन्टॉशसाहेबांविषयी सांगितला जातो. ते आफ्रिकेच्या जंगलात शिकारीसाठी गेले असता, सिंहासोबत भाल्याने लढताना एका आदिवासी तरुणाला पाहतात. तो सिंहाला पराभूत करतो. त्याच्या प्रंचड शक्तीवर मॅकिन्टॉशसाहेब खूश होतात. ते त्या आदिवासी तरुणाला घरी घेऊन येतात. ते त्याला सेवक म्हणून नेमतात. मात्र शहरातील काहीही माहिती नसलेला हा तरुण उलटसूलट कामे करतो.
चहा ट्रेमध्ये आण, असे साहेब त्या तरुणाला सांगतो. दुपारी साहेब बाहेर निघाल्यावर त्याला बूट आणायला सांगतो, तेव्हा हा तरुण ट्रेमधून बूट घेऊन येतो. आता मात्र साहेबांची खात्री पटते की, ज्या कामात तो तरुण हुशार आहे त्याला तेच काम करू द्यावे. मॅकिन्टॉशसाहेब त्या तरुणाला पुन्हा आफ्रिकेच्या जंगलात सोडून देतात.