शारजा – धावा काढण्याचा आळशीपणा पंजाबला भोवेल असे वाटत असतानाच निकोलस पुरनने अखेरच्या चेंडूवर षटकार मारून संघाला रॉयल चॅलेंजर बेंगळुरूविरुद्ध विजय मिळवून दिला. कर्णधार के.एल राहुल सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी 172 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबने मयंक आग्रवाल व कर्णधार लोकेश राहुल यांच्या फलंदाजीच्या जोरावर विजय दृष्टिपथात आणला होता. मयंक बाद झाल्यानंतर युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने राहुलला सुरेख साथ दिली. या दोघांनी अर्धशतके पूर्ण केली. मात्र, 17 चेंडूत 10 धावा असे सोपे समीकरण गेलने धावा काढण्यात आळशीपणा केल्याने अवघड बनले. चोरटी धाव घेताना गेल धावबाद झाला. त्यानंतर मात्र, निकोलस पुरनने अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एका धावेची गरज असताना षटकार मारला व संघाचा विजय साकार केला.
तत्पूर्वी, रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली व ख्रिस मॉरिसने वादळी फलंदाजी करत बेंगळुरूला 6 बाद 171 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. सलामीवीर ऍरन फिंच व देवदत्त पडीक्कल यांनी आक्रमक सुरुवात केली. मात्र, 38 धावांच्या सलामीनंतर त्यांनी अत्यंत स्वस्तात आपल्या विकेट गमावल्या. पडीक्कलला 18 धावांवर अर्शदीप सिंगने बाद केले. तर, मुरुगन अश्विनचा फ्लिपर फिंचला समजलाच नाही व त्याचा 20 धावांवर त्रिफळा उडाला. त्यावेळी शिवम दुबेने कोहलीला सुरेख साथ केली. या जोडीने 14 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले.
दुबे 19 चेंडूंत 2 षटकारांच्या मदतीने 23 धावा करून बाद झाला. डीविलियर्सनेही निराशा केली. कोहलीही शमीच्याच गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 39 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 48 धावांची खेळी केली. त्यावेळी बेंगळुरूच्या 6 बाद 136 धावा झाल्या होत्या. तळात ख्रिस मॉरिस व इसुरू उदाना यांनी वेगाने धावा केल्याने बेंगळुरूला 6 बाद 171 धावांपर्यंत मजल मारता आली. मॉरिसने 3 षटकार व 1 चौकार फटकावताना केवळ 8 चेंडूत नाबाद 25 धावा केल्या. तर, उदानाने 5 चेंडूत 1 षटकार फटकावून नाबाद 10 धावा केल्या. या जोडीने 35 धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 6 बाद 171 धावा. (विराट कोहली 48, शिवम दुबे 23, ऍरन फिंच 20, ख्रिस मॉरिस नाबाद 25, इसुरू उदाना नाबाद 10, मुरुगन अश्विन 2-23, महंमद शमी 2-45). किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 2 बाद 177 धावा. (मयंक आग्रवाल 45, ख्रिस गेल 53, लोकेश राहुल नाबाद 61, निकोलस पुरन नाबाद 6, यजुवेंद्र चहल 1-35).