दिंडोरी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. भारती पवार यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीतून अजूनपर्यंत दिंडोरीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
या पार्श्वभूमीवर विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या तुलनेत महाविकास आघाडीला अजुनही तुल्यबळ उमेदवार मिळालेला नाही. या मतदारसंघातून माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी भाजपकडून विजयाची हॅट्रिक केली होती.
त्यानंतर डॉ. भारती पवार दिंडोरीच्या खासदार बनल्या. महाविकास आघाडीतून उमेदवाराची शोधाशोध सुरु असतानाच आता गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटाची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.