नवी दिल्ली – कॉंग्रेसवर चार वर्षापुर्वीच्या एका आयकर विवरण पत्रातील विसंगतीच्या प्रकरणात दोनशे कोटी रूपयांच्या जप्तीची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांचे बँक खातेही गोठवण्यात आले आहे. त्याच्या विरोधात कॉंग्रेसला काल उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. त्या पाठोपाठ आज दुसऱ्या दिवशी आयकर खात्याने कॉंग्रेसला दंड आणि व्याज मिळून तब्बल १८०० कोटी रूपयांच्या वसुलीची नवी नोटीस जारी करण्यात आली आहे. (Big blow for Congress: Party served with income tax notice of Rs 1,800 crore)
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना विरोधकांवर सरकारकडून सुरू असलेला हा कर दहशतवाद आहे असे कॉंग्रेसने म्हटले आहे. या नव्या नोटीशीला कोर्टात आव्हान दिले जाणार असल्याचे पक्षाचे खजिनदार अजय माखन यांनी सांगितले. ते म्हणाले की आमच्या पक्षाच्या २३ आमदार आणि खासदारांनी १४ लाख रूपयांचा निधी पुर्वी दिला होता.
ज्यांनी हा निधी दिला आहे त्यांची नावे आणि पत्तेही कॉंग्रसने आपल्या विवरण पत्रात सादर केली आहेत. पण त्यावरून आमच्यावर आयकर खात्याने बळजबरीने कारवाई केली आहे. पण भाजपच्या खात्यातील एका व्यवहारात पक्षाला अनेक लोकांनी एकूण ४२ कोटी रूपये देणगी दिल्याची नोंद आहे. पण त्यातील अनेकांची नावे आणि पत्तेही त्यांनी सादर केलेली नाहीत. याच आधारावर भाजपवरही अशीच कारवाई का केली गेली नाही असा सवाल अजय माकन यांना उपस्थित केला.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की कॉंग्रेसला आर्थिक दृष्ट्या विकलांग करून निवडणूक प्रचार रोखण्याचा प्रकार भाजप सरकारने केला असला तरी आम्ही त्यातून खचून किंवा दबून जाणार नाही. आम्ही आमचा प्रचार नेटाने करू आणि पक्षाच्यावतीने मतदारांना ज्या हमी देण्यात आल्या आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहचवू.