कोल्हापूर : सततचे आजारपण, उपचारादरम्यान होणाऱ्या वेदना न पाहावल्याने सख्ख्या भावाने व पोटच्या मुलाने बापाचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली.
नामदेव पांडुरंग भास्कर (वय 63, रा. कुडीत्रे, ता. करवीर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना 21 मे रोजी सीपीआर रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागात घडली होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा गुन्हा उघडकीस आला. याप्रकरणी गिरीष नामदेव भास्कर (वय 32, रा. कुडीत्रे, ता. करवीर) याला पोलिसांनी रविवारी सकाळी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करवीर तालुक्यातील कुडीत्रे येथील नामदेव पांडुरंग भास्कर हे शेतकरी होते. त्यांचा मूळ व्यवसाय शेती होता. काही कारणाने त्याच्या उजव्या पायाच्या जांघेमध्ये गाठ उठली होती. यावर उपचारासाठी त्यांना कुटुंबियांनी 17 मे रोजी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
दरम्यान उपचार सुरू असताना,होणाऱ्या वेदना पाहावल्याने त्याचा मुलगा गिरीष आणि सख्खा भाऊ तुकाराम यांनी रुग्णालयात नामदेवचा जीव घेण्यासाठी त्याला उपचारादरम्यान लावलेल्या सलाईन काढून, नाकात कापसाचे बोळे घातले होते. तसेच कापडी रुमालाने तोंड दाबून, गळा आवळला होता.