कराड – दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलानेच डोक्यात लोखंडी पार घालून वडलांचा खून केला. जखिणवाडी (ता. कराड) येथे शनिवार दि. 11 रोजी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित अर्जुन नलवडे-पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
शिवाजी नारू नलवडे-पाटील (वय 70, रा. जखिणवाडी ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी नलवडे-पाटील जखिणवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजीक त्यांच्या कुटुंबांसह वास्तव्यास आहेत. शनिवारी रात्री शिवाजी नलवडे-पाटील यांचा मुलगा अर्जुन याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांचा मुलगा अर्जुन याने चिडून जाऊन शिवाजी नलवडे- पाटील यांच्या डोक्यात लोखंडी पार घातली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तसेच जास्त प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संशयित अर्जुन याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.