पुणे – एका बाजूला शहरासह ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसऱ्या बाजूला करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याचे दिसून येत आहे. ही एक दिलासादायक बाब असून मागील एक महिन्यापूर्वी करोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग आता 32 दिवसांवर होता. तर आता रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांवर गेला आहे.
सध्या, घरोघरी सर्वेक्षण सुरू केल्यामुळे बाधितांची संख्या वाढत असून पुढील संसर्ग टळत आहे; परंतु या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 40 दिवसांवर आला आहे. मागील महिन्यापासून रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीमध्ये वाढ होत आहे.
पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेट हा 24.3 टक्के इतका आहे. यामध्ये घट होत असल्याचे चित्र आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 93 हजार 962 नमुने तपासले असता 29 हजार 8 इतके करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
यावेळी पॉझिटिव्ही रेट हा 30.8 टक्के इतका होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 99 हजार 83 इतक्या तपासण्या केल्या असता 29 हजार 562 करोनाबाधित रुग्ण आढळले यावेळी पॉझिटिव्हीचे प्रमाण 29.8 टक्के इतके होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात करोनाचे रुग्ण आढळल्याचे प्रमाण 25.8 टक्के होते.