“सोमेश्‍वर’चे बिगुल वाजले अन्‌पुढे ढकलले

वाघळवाडी – बारामती तालुक्‍यातील माळेगावची रणधुमाळी ऐन रंगात असतानाच सोमेश्‍वर सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल गुरुवारी (दि. 30) वाजला होता. निवडणुकीचा कार्यक्रम राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी जाहीर केला होता. मात्र, शुक्रवारी (दि. 31) राज्य सरकारने सहकार खात्याच्या सर्व निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याने गुरुवारी (दि. 30) सोमेश्‍वर कारखान्यासाठीचे वाजलेले बिगुल 24 तासांतच तीन महिने पुढे ढकलले गेले आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे सोमेश्‍वर कारखाना कार्यक्षेत्रात आता निवडणुकीचा धुरळा उडणार होता. मात्र, आता तीन महिने निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्याने इच्छुकांसाठी आता तीन महिन्यांचा वेळ मिळाला असला तरी अनेकांचे आराखडे कोलमडणार असल्याने निवडणूक पुढे ढकलली गेल्याने “थोडी खुशी थोडी गम’ म्हणण्याची वेळ इच्छुकांवर आली आहे.

सोमेश्‍वर कारखाना राष्ट्रवादीच्या ताब्यात असून 2015मध्ये जे विरोधक होते ते आता राष्ट्रवादीच्या गोटात सहभागी झाले आहे. त्यांच्यासह विद्यमान अध्यक्ष व आणखी तीन-चार जण अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत, तर संचालकपदासाठी इच्छुकांची उमेदवारांची राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मांदियाळीच आहे. त्यातच विद्यमान अध्यक्षांना विरोध करायचा म्हणून राष्ट्रवादी सहभागी झालेले शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून कायम कुरघोडी करून वरिष्ठांच्या डोळ्यात येण्यासाठी धडपड करीत आहेत.

अनेकवेळा ते तोंडावरही पडले आहेत, तर कधी सभासदांच्या हितासाठी फायद्याचेही ठरले आहेत, त्यामुळे ते राष्ट्रवादीत असले तरी सभासदांना न्याय देण्यासाठी वेगळे पॅनल उभे करणार की माघार घेणार, हे लवकरच समजेल. निवडणूक कधीही लागो 21 संचालक मंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडून येणार, असे कार्यक्षेत्रात बोलले जात आहे.

डोकेदुखी ठरणारा की, मर्जीतील अध्यक्ष…
सोमेश्‍वर साखर कारखान्यात अजित पवारांचा शब्द अंतिम असतो हे जगजाहीर आहे. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी जरी असली तरी आपल्या आदेशावर चालाणारी व्यक्‍ती कारखान्याच्या अध्यक्षपदी असावी यासाठी अजित पवार मर्जीतील व्यक्‍तीला स्थान देण्याची शक्‍यता अधिक आहे. कारखान्याच्या कामात विरोध नको म्हणून डोकेदुखी ठरणाऱ्या व्यक्‍तींवर जबाबदारी सोपवून त्यांना आपल्या इशाऱ्यावर काम करण्यास भाग पाडणा, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. आता निवडणूक पुढे ढकलल्याने अध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागली पाहिजे, याचा अभ्यास करण्यासाठी अजित पवारांना जादाचा वेळ मिळाला आहे.

असा होता निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करणे : शनिवार (दि. 1) ते गुरुवार (दि. 6). अर्जाची छाननी : शुक्रवार (दि. 7). वैध उमेदवाराची यादी प्रसिद्धी : सोमवार (दि. 10). अर्ज माघारी घेणे : सोमवार (दि. 10) ते सोमवार (दि. 24). अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी : मंगळवार (दि. 25). मतदान प्रक्रिया : दि. 7 मार्च रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5. मतमोजणी : दि. 9 मार्च रोजी सकाळी 9 वाजता सुरू करून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार होता. मात्र, आता तीन महिन्यांनंतर नवीन तारखा जाहीर केल्या जाणार आहेत.

भाजप माघार घेणार की आखाड्यात उतरणार…
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातील माळेगाव कारखाना भाजपच्या ताब्यात असल्याने तो पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे, तर राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील सोमेश्‍वर कारखान्यातही शिरकाव करण्यासाठी भाजप या आखाड्यातही उतरण्याची शक्‍यता असून, त्या दृष्टीने त्यांच्या हालचालींना वेग आला आहे. तर माळेगावच्या रणधुमाळीत सोमेश्‍वरच्या रणधुमाळीकडे लक्ष देणे होणार का, याची चाचपणी भाजप करण्याची शक्‍यता होती. मात्र, आता सोमेश्‍वरची निवडणूक पुढे ढकलल्याने चाचपणी करण्यास त्यांना वेळचवेळ मिळाल्याने आता ते सोमेश्‍वरच्या आखाड्यात उतरणार की माघार घेणार, हे पाहणे औत्सुक्‍याचे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.