नर बिबट्या जेरबंद झाला त्या ठिकाणी पुन्हा मादीच्या पायाचे ठसे आढळले
डोर्लेवाडी -बारामती तालुक्यातील कण्हेरी येथील संतोष जाधव यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी (दि. 30) नर जातीचा बिबट्या जेरबंद झाला होता, तर मादी जातीचा बिबट्या पिंपऱ्याला गुंगारा देत पसार झाला आहे. शुक्रवारी (दि. 31) जाधव यांच्या शेतात पुन्हा बिबट्याचे ठसे आढळून आले असल्याने परिसरात मादी बिबट्याची दहशत कायम आहे.
शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास काटेवाडीच्या बिरोबा मंदिराजवळ दिलीप शिंदे यांच्या शेतात काम करणाऱ्या भिवा घुले यांनी हा बिबट्या पाहिला. घुले सकाळी बैलगाडीत मका भरत असताना अचानकच शेतातून बिबट्या समोर आला.
बिबट्याला पाहून बैलजोडी बिथरल्याने घुले बैलगाडीवरून खाली पडले, मात्र बैल आक्रमक झाल्याचे पाहून बिबट्याने धूम ठोकली. कण्हेरी भागातील शेतकरी संतोष जाधव हे शुक्रवारी सकाळी शेतात गेले असता त्यांना उसामध्ये प्राण्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने त्यांनी याबाबत वनविभागास कळवले. वनविभागाने संबंधित ठिकाणी येत पाहणी केली असता हे ठसे बिबट्याचेच असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे मादी जातीचा बिबट्या अजूनही याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गुरुवारी या विभागात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला, मात्र त्याच्याबरोबर असलेली मादी पसार झाली होती. दरम्यान, बिबट्या जेरबंद होताना त्या मादीने प्रत्यक्षात पाहिले असल्याने ती पिसाळलेली आहे. दरम्यान, परिसरात पिंजरा लावलेला असला तरी तो उघडणार नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. कारण बिबट्या असेल तर तो चवताळण्याची भीती असल्याने चार दिवसांनंतर पुन्हा पिंजरा कार्यान्वित केला जाणार आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही बिबट्याचा शोध घेत आहेत.
आज आढळून आलेले ठसे बिबट्याचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी दोन कॅमेरे लावण्यात आले असून आवश्यकता वाटल्यास अजून दोन ट्रॅप कॅमेरे लावण्यात येतील; मात्र पिंजरा चार दिवस लावता येणार नाही. दरम्यान, मादी जरी पिसाळली असली तरी गुरुवारी आणि शुक्रवारी कुठेही पाळीव प्राण्यावर हल्ला केल्याचे आढळून आलेले नाही.
– त्र्यंबक जराड, वनपरिक्षेत्र अधिकारी, बारामती