नगर – नगर तालुक्यातील बीएलओ असलेल्या प्राथमिक शिक्षकांना तहसीलदार यांनी कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्याबद्दल नोटीस जारी केली होती. या नोटिशीला नगर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी व खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने तहसील कार्यालयात एकत्रीत येत खुलासा सादर करून वरील बहिष्कार कायम असल्याचा पुनरुच्चार तालुका समन्वय समितीचे राजेंद्र निमसे ,राजेंद्र ठाणगे ,दत्तात्रय कुलट, आबा लोंढे , बाळासाहेब देंडगे ,सुनील सोनवणे , खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे सचिव विट्ठलप्रसाद तिवारी, तेजस्विनी शिंदे, दिपाली कापरे यांनी केला आहे.
तहसीलदार यांनी बीएलओच्या सभेस अनुपस्थित राहणे, या कामात हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे कायदेशीर रित्या गुन्हा का दाखल करू नये, तसेच गुन्हा शाबीत झाल्यास दोन वर्ष कारावास व दंड होऊ शकतो तसेच निलंबन किंवा बडतर्फी होऊ शकते असे नोटिशीत म्हटले आहे.
बीएलओ असलेल्या प्राथमिक शिक्षकांनी नोटिशीचा खुलाशात म्हटले आहे की बीएलओ सभेचा कोणत्याही प्रकारचा लेखी संदेश प्राप्त झाला नव्हता.तसेच यापूर्वी मतदान नोंदणी कामी माझ्याकडून टाळाटाळ व हलगर्जीपणा झालेला नाही.
त्या कामामुळे माझ्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होत असल्यामुळे मला हे काम देण्यात येऊ नये असे या पूर्वीही आपणास वेळोवेळी कळविलेले आहे. कोणतीही कारवाई न करता हा खुलासा मान्य करावा अशी सर्व शिक्षकांनी एकत्रीत विनंती केलेली आहे.