मुंबई – मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत मनी लॉंड्रिंग झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीच्या किरीट सोमय्या यांनी केला. या कंपनीशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे ते स्वतः त्यांनीच जाहीर करावे; असे किरीट सोमय्या म्हणाले.
आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांचे हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीसोबत अनेक आर्थिक व्यवहार झाले आहेत. सध्या नंदकिशोर चतुर्वेदी फरार आहे. तपास यंत्रणा नंदकिशोर चतुर्वेदीला शोधत आहेत. चतुर्वेदीने कोट्यवधी रुपयांचे मनी लॉंड्रिंग केले आहे.
ठाकरे सरकारने भ्रष्टाचार करून लुटलेल्या पैशांची व्यवस्था लावण्याचे काम नंदकिशोर चतुर्वेदी ही व्यक्ती मनी लॉंड्रिंगच्या माध्यमातून करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपविले आहे, असा प्रश्न सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून उपस्थित केला.
श्रीधर पाटणकर यांची श्रीजी होम्स नावाची रिअल इस्टेट कंपनी आहे. या कंपनीने मुंबईत शिवाजी पार्क परिसरात कोट्यवधी रुपयांची इमारत बांधली आहे. या कंपनीच्या माध्यमातून मनी लॉंड्रिंग झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. आदित्य ठाकरे आणि चतुर्वेदी यांच्या तीन कंपन्या आहेत; असेही सोमय्या म्हणाले.