पुणे -यंदाचा गणेशोत्सव सीमेवरही साजरा होणार आहे. लष्करातील अरुणाचल प्रदेश आणि पंजाब येथील बटालियनमध्ये दगडूशेठच्या “श्रीं’च्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. यासाठी पुण्याहून “श्रीं’ची हुबेहुब 2 फुट आकाराची मूर्ती अरुणाचल प्रदेश आणि पठाणकोटकडे मार्गस्थ झाली.
दरवर्षी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. मात्र, सीमेवर कार्यरत असणाऱ्या सैनिकांना पुण्यामध्ये येता येईलच असे नाही. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करातील 1 आणि 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी अरुणाचल प्रदेश आणि पंजाबमधील पठाणकोट येथे
दगडूशेठच्या “श्रीं’ची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानुसार ट्रस्टने प्रतिकात्मक मूर्ती देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने यांनी सैनिकांना ही मूर्ती सुपूर्त केली.
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती
मराठा बटालियनचे कर्नल जयकुमार मुदलियार आणि विनोद पाटील यांनी दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची प्रतिष्ठापना लष्कराच्या पोस्टमध्ये करण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती मूर्ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मूर्तीप्रमाणेच असावी, अशा आशयाचे पत्र त्यांनी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्याकडे पाठवले होते.
पुण्यातून आमची बटालियन टेंगा व्हॅली, अरुणाचल प्रदेश येथे चायनीज बॉर्डर परिसरात जात आहे. मराठा बटालियन दरवर्षी गणेशोत्सव साजरी करते. त्यामुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्रतिकात्मक गणेश मूर्तीची स्थापना आम्ही तेथे करू इच्छितो, असेदेखील पत्रात नमूद केले आहे.