Soldier – भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांचा तंदुरुस्तीचा अर्थात फिटनेसचा दर्जा कमी होत चालला असल्याच्या पाश्र्वभूमीवर लष्कराकडून फिटनेससंदर्भात नवे धोरण आणण्यात आले आहे. त्याकरता आता घेतल्या जात असलेल्या चाचण्यांसोबतच आणखी काही नव्या चाचण्या आणि आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेंट कार्ड अर्थात अपॅकही अनिवार्य केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
लष्करात आता नवीन धोरण लागू करण्यात आले असून त्या अंतर्गत अनेक नव्या तपासण्यांचा आता समावेश करण्यात आला आहे. जर सैनिक या नव्या निकषांच्या कसोटीवर खरे उतरले नाहीत तर त्यांना अगोदर सुधारणेसाठी ३० दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. तरीही सुधारणा झाली नाही तर त्यांच्या सुट्ट्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
एका प्रख्यात इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर याबाबतची बातमी देण्यात आली आहे. त्यात असे म्हटले आहे की नव्या नियमांनुसार एका कमांडिंग अधिकाऱ्याऐवजी ब्रिगेडिअर रँकचा अधिकारी आता यापुढे तिमाही होणाऱ्या परिक्षण चाचण्यांचा पीठासीन अधिकारी असेल.
ज्या सैनिकांचे वजन अधिक असेल आणि ३० दिवसांच्या आत त्यांच्याकडून जर त्या दिशेने कोणती सुधारणा झाली नाही तर त्यांच्या विरोधात कठोर कृती केली जाईल. आता ज्या चाचण्या घेतल्या जात आहेत त्या घेतल्याच जातील पण आणखी काही नव्या चाचण्याही फिटनेसच्या तपासणीसाठी घेतल्या जाणार आहेत. त्याकरता प्रत्येक सैनिकासाठी आर्मी फिजिकल फिटनेस असेसमेंट कार्ड तयार केले जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व कमांडस्ना यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे व त्यानुसार तपासणी प्रक्रियेत एकरूपता आणणे हा यामागील उद्देश आहे. तसेच अधिकाऱ्यांचे शारिरिक दृष्ट्या अयोग्य असणे अथवा स्थूल असणे आणि पोस्टींग तसेच जीवनशैलीशी निगडीत आजारांसारख्या विषयांवर तोडगा काढणे ही देखील यामागची भावना आहे.
सध्या लष्करात दर तीन महिन्यांनी बॅटल फिजिकल एफिशियन्सी टेस्ट अर्थात बीपीएटी आणि फिजिकल प्रोफीशीअंसी टेस्ट अर्थात पीपीटी होत असते. बीपीएटी टेस्टमध्ये एका व्यक्तीला ५ किमी धावणे, ६० मीटरची स्प्रिंट, दोरीच्या आधारावर वर चढणे, निर्धारित वेळेत ९ फूटांचा खड्डा पार करावे लागते. अधिकाऱ्याच्या वयानुसार यासाठीची वेळ निर्धारित केली जाते.
तर पीपीटीमध्ये २.२४किमी धावणे, ५ मीटर शटल, पुश अप्स, चीन अप्स, सिट अप्स, आणि १०० मीटरची स्प्रिंट करावी लागते. याशिवाय काही ठिकाणी पोहण्याचीही टेस्ट असते. या चाचण्यांचे निष्कर्ष अथवा निकाल ॲन्युअल कॉन्फिडेन्शिअल रिपोर्ट अर्थात एसीआरमध्ये नोंदवले जातात. त्याची जबाबदारी कमांडिंग ऑफिसरकडे असते.
आता नवीन नियमांनुसार ब्रिगेडिअर रँकचा अधिकारी, दोन कर्नल आणि एक वैद्यकीय अधिकारी एकत्रितपणे दर तीन महिन्यांनी संबंधित उमेदवाराचे अथवा अधिकाऱ्याच्या फिटनेसचे आकलन करतील. तसेच सैनिकांना बीपीईटीआणि पीपीटीच्या सोबतच आणखी काही टेस्ट द्याव्या लागतील. त्यात १० किमी स्पीड मार्च, दर सहा महिन्यांनी ३२ किमीचा रूट मार्च याचा समावेश असेल. त्याचबरोबर ५० मीटरची स्विमिंगची टेस्टही द्यावी लागणार आहे.
जे सैनिक या चाचण्या पूर्ण करण्यात अपयशी ठरतील अथवा वजन वाढले असल्याचे आढळून येईल त्यांना सुधारणेसाठी ३० दिवसांची मुदत दिली जाईल. तरीही सुधारणा झाली नाही तर त्यांच्या सुट्ट्यांचा कालावधी कमी करणे आणि टीडी कोर्सेसमध्ये कपात करणे आदी कारवाई केली जाणार आहे.