पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासन गृहनिर्माण सोसायट्यांची मदत घेणार आहे. जे थकबाकीदार कर भर नाहीत. त्यांना कर भरण्याच्या सूचना कराव्यात. अन्यथा सोसायटीचे पाणी तोडावे लागेल, असा इशारा या नोटीसमध्ये दिला जाणार आहे. माहिती महापालिकेच्या कर संकलन विभागाचे प्रभारी अधिकारी माधव जगताप यांनी दिली.
महापालिकेचा कर थकल्यास संबंधित व्यक्तीचे पाणी बंद करण्याचा अधिकार असला, तरी गृहनिर्माण संस्थेत सर्व सोसायटीला पाणी दिले जाते. त्यामुळे सोसायटीचे पाणी तोडण्याशिवाय पर्याय राहत नसल्याने सोसायटीनेच संबंधित थकबाकीदारास सूचना कराव्यात, या उद्देशाने या नोटीस बजाविण्यात येणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
जगताप म्हणाले, गृहनिर्माण सोसायटींची थकबाकी सुमारे २,२०० कोटी रुपयांची आहे. वारंवार त्यांना नोटीस बजाविण्यात येतात. मात्र, सोसायटी सुविधा देत असल्याने आपल्यावर कारवाई होणार नाही, या बाबीचा गैरफायदा घेत काही सभासद वर्षानुवर्षे कर भरत नाहीत. तर अनेक जण न्यायालयात वाद सुरू असल्याचे सांगत महापालिकेची बिले थकवत असून, ही थकबाकी वाढतच आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाणी, सुविधा बंद करा
महापालिकेकडून सोसायटीची मदत घेताना संबधित मिळकतधारकाची माहीती आणि थकबाकी कळविण्यात येत आहे. हे पैसे भरले जात नसल्याने त्यांंना सोसायटीने पाणी देऊ नये तसेच अॅमेनिटी स्पेस वापरण्यास मनाई करावी, अशा सूचना करण्यात येणार आहेत. तसेच सोसायटीकडून याला प्रतिसाद न दिल्यास सोसायटीवर कारवाईचा बडगा उभारला जाणार आहे.
महापालिकेचे काॅल सेंटर
महापालिकेकडून आता थकबाकी वसुलीसाठी काॅल सेंटर सुरू केले जाणार आहे. त्या अंतर्गत महापालिकेकडून थकबाकीदारांना फोन करण्यात येणार आहेत. पुढील दोन दिवसात हे सेंटर सुरू केले जाणार असून, नोटीस तसेच मेसेजला प्रतिसाद दिला जात नाही. थेट फोन करून त्यांना थकबाकीची तसेच ती न भरल्यास महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाईची माहिती दिली जाणार आहे.