आतापर्यंत 1 लाख 72 हजार 354 फूड पाकिटे व अन्नधान्य किटचे वाटप
पुणे – दैनंदिन अन्नधान्य व जेवणाच्या समस्या निर्माण झालेल्या पुण्यातील गरजू नागरिकांसाठी पुणे पोलिसांच्या वतीने सोशल पोलिसिंग सेल तयार करण्यात आला आहे. त्याअंतर्गत शहरातील दानशूर व्यक्ती तसेच विविध संस्थाकडून अन्नाची पाकिटे, अन्नधान्य पाकिटे तसेच हॅन्ड सॅनिटायझर, मास्क, साबण, पाणी आदी गोळा करून नागरिकांना वाटण्यात येणार आहे.
दि. 7 एप्रिल रोजी स्थापन करण्यात आलेल्या या सेलमार्फत आत्तापर्यंत 1 लाख 72 हजार 354 फूड पाकिटे व अन्नधान्य किट गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. तर, 25 मार्च ते 11 एप्रिलदरम्यान 3 लाख 93 हजार 354 फूड पाकिटे व अन्नधान्य किट गरजू मजूर, बेघर, परप्रांतीय कामगार, सेक्स वर्कर, तृतीयपंथीय, बाहेर गावचे विद्यार्थी, पुणे शहरातील ससून हॉस्पिटल, कमला नेहरू हॉस्पिटल आदी विविध उपचारासाठी ऍडमिट असणारे रुग्णांचे नातेवाईक यांना देण्यात आली आहेत.
अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) डॉ. संजय शिंदे, उप-आयुक्त (गुन्हे) बच्चन सिंह, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांसह वाहतूक विभागातील 20 कर्मचारी व पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे अधिकारी व कर्मचारी सोशल पोलिसिंग सेल अंतर्गत काम करणार आहेत. पोलिसांच्या या सेवेचा शेकडो कुटुंबांना लाभ मिळत असल्याचे सांगण्यात आले.