इस्लामाबाद – तब्बल आठवड्याभरानंतर देखील पाकिस्तानमधील एक्स हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद आहे. यामागील नेमके कारण काळजीवाहू सरकारकडून अजूनही स्पष्ट केले गेलेले नाही. गेल्या शनिवारपासून सोशल मीडीया बंद आहे. एक्सवरून कोणतीही पोस्ट शेअर केली जाऊ शकत नाही.
काळजीवाहू माहिती तंत्रज्ञान मंत्री डॉ. उमर सैफ हे प्रतिक्रीयेसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. तसेच दूरसंचार प्राधिकरणाकडूनही यासंधर्भात कोणतेही निवेदन दिले गेलेले नाही.
सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशीच मोबाईल इंटरनेट खंडीत केले गेले होते. दहशतवाद, अफवा आणि हिंसाचार पसरू नये, म्हणून ही खबरदारी घेतली गेली होती. त्यानंतर निवडणुकीत गैरप्रकारांचे आरोप झाल्यामुळे इंटरनेट बंद होते.
त्यानंतर सरकार स्थापनेबाबतचा घोळ सुरू असल्यामुळे इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. आता पीएमएल-एन आणि पीपीपीचे आगाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला असतानाही सोशल मीडिया पूर्ववत सुरू झालेला नाही.
दरम्यान, सिंध उच्च न्यायालयाने गुरुवारी पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाला देशभरातील एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या सेवा पूर्णपणे पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आणि प्राधिकरणाकडून तपशीलवार उत्तर मागितले. मात्र प्राधिकरणाने अद्याप या आदेशांवर कारवाई केलेली नाही.