तळेगाव दाभाडे – कांतीलाल शाह विद्यालयात गुरूजनांकडून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाबरोबर त्यांच्यामध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवत आहेत. यामध्ये विद्यालयाचे अध्यक्ष शैलेशभाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी ग्रामीण भागातील शाळांना भेट देत पाहणी केली. या शाळांमधील विद्यार्थी गरीब, आदिवासी, कातकरी कुटुंबातील असल्याचे निदर्शनास आले आहे. शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या मुलभूत गरजाही त्यांना मिळत नाही.
या सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने जुने कपडे, पुस्तके, चित्रकलेचे साहित्य, सायकल अशा गोष्टी एकत्रित करून स्वतः मुलांनी आपले खाऊच्या पैशाची बचत केली. या कार्यात शिक्षक व विद्यार्थ्यांनी जमा केलेल्या पैशातून सुमारे 100 लोखंडी पेट्यांची व्यवस्था आश्रम शाळेतील मुलांना खासगी वस्तू ठेवण्यासाठी केली आहे. आणखी काही पेट्यांसाठी लायन्स क्लब मदत करणार आहे. उर्वरित पेट्यांकरिता तळेगाव आणि मावळातील दानशूरांना मदतीचे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विश्वस्त आणि कांतीलाल शाह शाळेचे अध्यक्ष शैलेशभाई शाह यांनी केले.
शालेय व्यवस्थापनाचे महेशभाई शहा, संजय साने, मुख्याध्यापिका सुमन रावत, प्रकल्प प्रभारी अर्चना मुरूगकर, सारीका तितर, संजली गरूड, अर्चना चव्हाण व शिक्षक उपस्थित होते. विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, शाळेचे संचालक व सदस्य तसेच लायन्स क्लब ऑफ तळेगावचे सदस्य सेवाधाम आश्रम शाळेला भेट देऊन या दिवशी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वागत मुख्याध्यापिका सुमन रावत यांनी केले. शाळेत होणाऱ्या गुरूपौर्णिमा, वृक्षारोपण व अन्य सामाजिक उपक्रमाची माहिती शिक्षिका अर्चना मुरूगकर यांनी दिली. प्रास्ताविक शाळेचे अध्यक्ष शैलेशभाई शाह यांनी केले. शाळेचे उपाध्यक्ष महेशभाई शहा यांनी आभार मानले.