संतापलेल्या प्रवाशांनी सातारा-कोल्हापूर पॅसेंजर रोखली ; रुकडी रेल्वे स्थानकावरील घटना

कोल्हापूर- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्‍यातील रूकडी रेल्वे स्थानकावर सातारा – कोल्हापूर ही रेल्वे पॅसेंजर ( गाडी नं. 51441) कांही काळ संतप्त प्रवाशांनी रोखून धरली. नेहमीच या पॅसेंजर रेल्वेला विद्यार्थी, व्यावसायिक व प्रवासी नोकरदारांची प्रचंड गर्दी असते. या रेल्वेला केवळ आठ डबे असून ती बारा डब्याची करावी, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे बऱ्याच वेळा झाली आहे. परंतु आज अखेर रेल्वे प्रशासनाने दाद दिलेली नाही.

रुकडीसह पंचक्रोशीतून बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी कोल्हापूरला जात असतात. तसेच या भागातील अनेक स्त्रिया नोकरी व कामानिमित्त गांधीनगरला जात असतात. या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे डब्यात चेंगराचेंगरीच्या व वादविवादाच्या घटना घडत असतात. अलिकडे सदर पॅसेंजर जवळपास अर्धा तास उशीराने येत आहे. त्यामुळे विद्यार्थी व नोकरदाराना अनेक वेळा मनस्तापाची वेळ आली होती. पॅसेजरच्या रोजच्या उशीरा येण्याला संतापलेल्या विद्यार्थी ‘ नोकरदार’ व्यावसायिक व महिलांचा अखेर आज उद्रेक झाला. सर्वांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडला.

यावेळी प्रवाशांनी रेल्वे स्टेशन प्रबंधक पंकज कुमार चौधरी यांना चांगलेच धारेवर धरले. प्रवाशांचा रूद्र अवतार पाहून उद्यापासून जादा डबे जोडण्याबरोबरच पॅसेंजर वेळेत येण्याची हमी त्यांनी दिली. यानंतर प्रवाशांनी माघार घेतली. याची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली असुन, उद्यापासून अंमलबजावणी होण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)