नवी दिल्ली – प्रतिवर्षी देशभर २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन आणि १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. मात्र, उज्जैनमध्ये हे दोन्ही दिवस ग्रेगरियन कॅलेंडरनुसार त्या तारखेला नव्हे, तर भारतीय पंचांगातील निथीनुसार साजरे केले जातात. त्यामुळे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात या महिन्यात प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ही तारीख १७ फेब्रुवारी रोजी येत असल्याने उज्जैनच्या बडे गणेश मंदिरात त्या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे.
उज्जैन शहरातील बडा गणपती मंदिरात प्रत्येकच सण वर्षानुवर्षे तिथीनुसार साजरा केला जातो. त्यामुळे १५ ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्तक दिन हे दोन्ही राष्ट्रीय सण त्यांच्या तिथीनुसार साजरे करण्याची परंपरा आहे. त्यामुळे तारीख नेहमी बदलते. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू झाली. हा दिवस माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी होता. यामुळेच यावेळी प्रजासत्ताक दिनाची तारीख १७ फेब्रुवारीला येत आहे.
तसेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी श्रावण कृष्ण चतुर्दशी होती. त्यामुळे दरवर्षी स्वातंत्र्यदिनही त्याच तिथीला साजरा केला जातो. यावर्षी ७६ वर्षांनी हीच तिथी १५ ऑगस्ट रोजी येत असल्याने स्वातंत्र्य दिन त्याच दिवशी साजरा केला जाईल.
भारतीय राज्यघटनेने जर आपले भारतीय पंचांग हे अधिकृत कॅलेंडर स्वीकारले आहे. तर मग आपले सर्व सण पंचांगाच्या तिथीप्रमाणे व्हायला हवेत, अशी यामागे भूमिका आहे. आपण भारतात राहतो आणि सनातन हे आपल्या धर्माचे आणि संस्कृतीचे मुख्य केंद्र आहे. त्यामुळे दिनदर्शिकेनुसार आणि तिथीनुसार सण साजरा करणे शुभ मानले जाते. या गोष्टी आपल्या धर्मग्रंथातही लिहिल्या आहेत.
पंचांगशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी पं. आनंदशंकर व्यास म्हणतात की तारखेनुसार सण साजरे करणे ही इंग्रजी परंपरा आहे. भारतीय सनातन धर्म आणि संस्कृतीत, पंचांग तिथीनुसार व्रताचा सण साजरा केला जातो. उज्जैनच्या मोठ्या गणपती मंदिरात ही परंपरा आजही पाळली जाते. व्यास कुटुंबीयही तिथीनुसार सण साजरा करतात. त्यामुळे मोठ्या गणेश मंदिरात दरवर्षी माघ शुक्ल अष्टमीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.