Aata Vel Zaali Movie : अभिनेता दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची मुख्यभूमिका असलेला ‘आता वेळ झाली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. या पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. अभिनेते प्रतीक गांधी यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे.
अनंत महादेवन यांनी या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. इच्छामरण विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. मात्र याचा अर्थ चित्रपट पाहिल्यानंतरच उलगडेल. दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह ‘आता वेळ झाली’ या चित्रपटात भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. येत्या 23 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.
View this post on Instagram
डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक), पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ‘आता वेळ झाली’ची निवड झाली आहे. या चित्रपटाद्वारे या दोन दिग्गज कलाकरांना एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.