दिल्लीत संसद मानरत्न, महारत्न पुरस्कारांचे विसरण
जळोची – संसदेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी आणि त्याचवेळी मतदारसंघातील नागरिकांसाठी सातत्याने कार्यरत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना चेन्नई येथील प्राईम पॉईंट फौंडेशन आणि ई- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद मानरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. याच संस्थेचा संसद महारत्न पुरस्कार सुद्धा दुसऱ्यांदा त्यांना जाहीर झाला आहे. येत्या दि. १७ फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे या दोन्ही पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून संसदरत्न, विशेष संसदरत्न, संसद महारत्न तसेच संसद मानरत्न पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फौंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. तेरा वर्षांपासून संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात येत आहे. दिल्ली येथे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
सतराव्या लोकसभेतील खासदार सुळे यांची उपस्थिती, जनहिताचे उपस्थित केलेले प्रश्न, चर्चेतील सहभाग, मांडलेली खासगी विधेयके आणि एकूणच सर्वोत्तम कामगिरीसाठी त्यांना आतापर्यंत सातवेळा संसदरत्न, विशेष संसदरत्न, तर दोनवेळा संसद महारत्न आणि यावर्षी संसद मानरत्न या पुरस्कारासाठी निवड केल्याचे श्रीनिवासन यांनी म्हटले आहे.
खासदार सुप्रिया सुळे या संसदेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करीत असून विद्यमान १७ व्या लोकसभेतही त्यांची कामगिरी सर्वोत्तम अशीच राहिली आहे. त्यांनी चालू लोकसभेच्या कामकाजात एकूण ९३ टक्के उपस्थिती लावत २३८ चर्चांमध्ये सहभाग घेतला. ६०९ प्रश्न त्यांनी उपस्थित केले. १६ खासगी विधेयकेही त्यांनी संसदेत सादर केली आहेत. या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना सलग सातव्यांदा पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही त्यांना सर्वोत्तम कामगिरीसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.