…तर रेल्वे, बस बंद करणार- मुख्यमंत्री

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने गर्दी करू नये तसेच अनावश्‍यक प्रवास टाळावा. गर्दी ओसरली नाही तर सरकारला कठोर निर्णय म्हणून नाईलाजाने रेल्वे, बससेवा बंद करण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिला.

सरकारी कर्मचाछयांची उपस्थिती कमी करून उपनगरीय रेल्वे, बसमधील गर्दी कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. तेव्हा जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. 

गेल्या काही दिवसांपासून करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असताना राज्यात करोनाबाधित रूग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. यापाश्वभूमिवर मंगळवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यामध्ये एकूण 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दुर्दैवाने त्यापैकी एका रुग्णाचा सकाळी मृत्यू झाला आहे. 26 पुरुष आणि 14 महिला आहेत. त्याच्यापैकी एक रुग्ण गंभीर असून अन्य सर्व रुग्णांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. अनावश्‍यक प्रवास टाळा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी ओसरली नाही तर नाइलाजाने कठोर पावले उचलावी लागतील. कठोर पवाले उचलण्याची इच्छा नाही.

आगामी 15 ते 20 दिवस महत्त्वाचे असून जनतेने स्वयंशिस्त पाळून सरकारला सहकार्य करावे. जे काही करता येणं शक्‍य असेल त्या सर्वाची तयारी सरकारने केलेली आहे. सर्वांनी सहकार्य केलं तर धोका आपण टाळू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारी कार्यालयांना आठवड्याची सुट्टी दिलेली नाही. मात्र 50 टक्क्‌यांवर कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणून कामकाज करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. गर्दी कमी करण्यासाठी सरकार म्हणून जी आवश्‍यक पावले आहेत ती पावलं आम्ही टाकत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

जनतेला या विषयाचे गांभीर्य कळलेले आहे. पुण्यामध्ये काहींनी स्वत:हून दुकाने बंद केली आहेत. मुंबईसह अन्य ठिकाणच्या दुकानदारांना विनंती करीत आहे की जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता ज्या दुकानांची आवश्‍यकता नाही, अशी दुकाने बंद ठेवण्यात यावीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्राकडून परवानगी मिळाल्यानंतरच लॅब वाढवणार
प्रायव्हेट लॅबलला या चाचण्यांची परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. लॅबची संख्या वाढविण्यासाठी केंद्राकडून परवानगी घ्यावी लागते.

हे कीट सरकारच्या माध्यमातून येत असतात. सध्या पुण्यातील एनआयव्ही लॅबकडे प्रमाणीकरणासाठी कीट आलेले आहेत. मात्र त्याबाबत केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतरच त्याबाबत पुणे जाता येईल. चाचण्या प्रमाणीकरण झाल्यानंतर हे कीट घेता येतील.

सर्व धर्मियांच्या धर्मगुरूंनीही गर्दी रोखण्यासाठी पावले उचलावीत

सिद्धिविनायक, शिर्डी मंदिर, जोतिबा मंदिर यासह अनेक मंदिर व्यवस्थापनांनी स्वत:हून पुढाकार घेऊन मंदिरे भक्तांसाठी बंद ठेवली आहेत. त्यांनी करोनासंदर्भात घेतलेल्या या काळजीबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. या प्रमाणेच सर्व धर्मियांच्या धर्मगुरूंनीही गर्दी रोखण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.