पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – फ्लॅटफाॅर्मवरून ट्रेन सुटली आणि एक प्रवासी पळत जाऊन ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान, त्याचा तोल गेला आणि तो पडला. त्यावेळी आरपीएफच्या जवानाने तत्काळ प्रवाशाला बाजूला केल्यामुळे त्याचा जीव वाचला. जवानाच्या या सतर्कतेमुळे रेल्वे प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. फ्लॅटफाॅर्म क्रमांक 3 वर ट्रेन क्रमांक 11301 उद्यान एक्सप्रेस पुणे स्टेशनवर आली. काही मिनिटे थांबून ट्रेन पुढे मार्गस्थ होताच ही घटना घडली. त्यावेळी प्रवासी ट्रेन व फ्लॅटफाॅर्ममध्ये अडकणार, तोच आरपीएफ विभागातील एमएसएफ कर्मचारी दिगंबर देसाई यांनी प्रसंगावधान राखत प्रवाशाला खेचून बाजूला केले. त्यानंतर उद्यान एक्स्प्रेस थांबविण्यात आली. त्या प्रवाशाला ट्रेनमध्ये सुखरूप बसविण्यात आले.
चालत्या ट्रेनमध्ये बसू अथवा उतरू नका…
फ्लॅटफाॅर्मवर येताना ट्रेनचा वेग कमीकमी होतो आणि काही प्रवासी याच वेळी ट्रेनमधून उतरतात. त्यामध्ये तोल जाऊन अपघातही झाले आहेत. काहींना जीव गमवावा लागला आहे. तसेच फ्लॅटफाॅर्मवरून ट्रेन निघताच प्रवासी पाठलाग करून चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात. यावेळीही अपघात होतात. त्यामुळे प्रवाशांनी असे टाळावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.