मंगळवारी दिवसभरात आढळला केवळ एक नवीन रूग्ण
बिजींग – ज्या चीन मधून करोना रोगाची जगभर लागण झाली, त्या चीन मध्ये करोना आटोक्यात येत असल्याची सुचिन्हे आहेत. त्या देशात आज दिवसभरात करोनाचा केवळ एक रूग्ण आढळून आला आहे. डिसेंबर मध्ये वुहानच्या मांस मार्केट मधून या विषाणुंचा फैलाव सुरू झाल्यानंतर तो वेगाने अन्यत्र पसरला आणि अक्षरश हजारो रोग या विषाणुंच्या तडाख्यात सापडले. त्यानंतर चीनने प्रभावी उपाययोजना करीत लक्षावधी लोकांच्या वावरावर निर्बंध आणले आणि करोनाग्रस्त भाग जगाच्या संपर्कापासून वेगळा केला.
तथापी दरम्यानच्या काळात दररोज सुमारे 20 हजार रूग्णांना या विषाणुंची बाधा होत असल्याचे आढळून आले होते. आता हे प्रमाण केवळ एका रूग्णावर आले आहे त्यामुळे या रोगाला आता बऱ्यापैकी अटकाव बसला असल्याचे मानले जात आहे. दरम्यान विदेशातून चीन मध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चौदा दिवसांच्या वैद्यकीय विलगीकरणाच्या अवस्थेत राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. विदेशातून आलेल्या व्यक्तींपैकी 20 जणांना या रोगाची बाधा झाल्याचे आढळून आल्यानंतर ही उपाययोजना करण्यात आली आहे.