पिंपरी – विधी समितीशी संबंधित विषय थेट महासभेपुढे मांडण्यावरुन विधी समिती सभापती अश्विनी बोबडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची सदस्यांसह भेट घेवून तीव्र संताप व्यक्त केला. विधी समितीचे अधिकार अबाधित ठेवावेत. यापुढे विधी समितीचा एकही विषय थेट महासभेकडे पाठविल्यास अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
पिंपरी महापालिका विधी समितीची पाक्षिक सभा आज (शुक्रवारी) पार पडली. सभापती अश्विनी बोबडे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. तत्पूर्वी बोबडे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. विषय समितीचे अधिकारी अबाधित ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोबडे म्हणाले, विधी समितीचे अधिकार अबाधित ठेवावेत.
थेट सर्वसाधारण सभेकडे विषय पाठवू नयेत. विधी समितीच्या अधिकारात येणारा विषय प्रथम समितीकडेच पाठविण्यात यावा. समितीची मान्यता घेऊन संबंधित विषय महासभेकडे पाठविण्यात यावेत. विधीच्या मान्यतेविना विषय महासभेकडे पाठविल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, विधी समितीच्या आजच्या सभेत महापालिका रुग्णालयासाठी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून डॉ. सौरभ गायकवाड यांना घेण्यास, डॉ. राजेंद्र फिरके, डॉ. लक्ष्मण गोफणे यांना ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर बढती देण्याच्या प्रस्तावाला तसेच इतर विषयांना मान्यता देण्यात आली.