खटला उशिरा दाखल झाल्याने विनाकारण वाढली तुरुंगवारी; पिंपळवंडीत पत्नीला मारहाण केल्याचे प्रकरण
राजगुरूनगर – सन 2014 साली पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे किरकोळ भांडणातून पत्नीला जबर मारहाण करणाऱ्या पतीस राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांनी तीन वर्षांपर्यंत शिक्षा सुनावली आहे.
सुदाम रभाजी वामन (वय 50 रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान घटनेनंतर संबंधित आरोपी पाच वर्षे जेल मध्येच असल्याने त्याची शिक्षा पूर्ण झाली आहे. तर दोन वर्षे त्याने जास्त शिक्षा भोगली आहे. या खटल्याची माहिती अशी की, सुदाम रभाजी वामन (वय 50) व त्याची पत्नी निवेदिता वामन यांची 18 ऑगस्ट 2014 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. दारूच्या नशेत असलेल्या सुदाम रभाजी वामन याने निवेदिता यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती जखमी झाली होती. यानंतर नारायणगाव पोलिसांनी सुदाम वामन याला अटक केली होती. तेव्हापासून तो येरवडा तुरुंगात होता.
हा खटला राजगुरुनगर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय क्र. 1चे न्यायाधीश एन. के. ब्रम्हे यांच्या समोर सुरु होता. त्याचा निकाल दि. 14 रोजी त्यांनी दिला. सरकारी पक्षाच्यावतीने सरकारी वकील अरुण ढमाले यांनी आठ साक्षीदार तपासले. जखमी महिला व त्यांचा आठ वर्षाच्या मुलाची साक्ष ग्राह्य धरत आरोपीला दोषी धरत तीन वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली.
गरिब असल्याने वकीलपत्र कोणीच घेतले नाही
सुदाम रभाजी वामन (रा. पिंपळवंडी) हे गरीब कुटुंबातील असून घटनेनंतर त्याचे वकील पत्र कोणीही घेतले नव्हते. पोलिसांनी त्यास अटक केल्यानंतर दि. 14 ऑगस्ट 2019पर्यंत येरवडा कारागृहात होता. त्याचे वकीलपत्र अखेर न्यायलयाने सरकारी खर्चातून हेमंत बगाटे यांना दिले होते. सुदाम वामन यांनी तब्बल पाच वर्षे जेलमध्ये राहिला असून त्याला शिक्षा मात्र तीन वर्षांची झाली आहे.